spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

नागपूरच्या समृद्धी गोमासेची राष्ट्रीय स्तरावर सुवर्णझेप

– तीन खेळांत सुवर्णपदकांची हॅट्ट्रिक, भालाफेकमध्ये रौप्यपदक; क्रीडा क्षेत्रात नागपूरचा अभिमान उंचावला

नागपूर :- नागपूरच्या क्रीडा क्षेत्रात अभिमानाची भर घालणारी उल्लेखनीय कामगिरी होतकरू खेळाडू कु. समृद्धी लक्ष्मण गोमासे हिने राष्ट्रीय स्तरावर नोंदवली आहे. बेटियां शक्ती फाउंडेशन संचालित वंदे मातरम् स्पोर्ट्स अकॅडमी, गोटाळ पांजरी, नागपूर येथील या प्रतिभावान खेळाडूने राष्ट्रीय स्पर्धेत तब्बल तीन सुवर्णपदके आणि एक रौप्यपदक पटकावत आपल्या कौशल्याचा, जिद्दीचा आणि अष्टपैलू प्रतिभेचा ठसा उमटवला आहे.

हैदराबाद (तेलंगणा) येथे १८ ते २१ नोव्हेंबर दरम्यान आयोजित माँटफोर्ट नॅशनल स्कूल गेम्स या प्रतिष्ठेच्या क्रीडा स्पर्धेत समृद्धीने आपल्या दमदार कामगिरीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.देशातील विविध माँटफोर्ट शाखांच्या संघांनी सहभाग घेतलेल्या या स्पर्धेत नागपूरच्या माँटफोर्ट स्कूलचे प्रतिनिधित्व करत समृद्धीने मैदानावर आपल्या खेळाची ताकद सिद्ध केली.

समृद्धीने गोळाफेक, थाळीफेक आणि व्हॉलीबॉल या तीन खेळ प्रकारांत सुवर्णपदके, तर भालाफेकमध्ये रौप्यपदक मिळवून विजयाची चौफेर पताका फडकवली. एकाच राष्ट्रीय स्पर्धेत विविध क्रीडा प्रकारांत अशी उत्कृष्ट कामगिरी करणे हे तिच्या कठोर मेहनतीचे, नियमित सरावाचे, प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाचे आणि जिद्दी वृत्तीचे फलित आहे.

तिच्या या यशामुळे नागपूरच्या क्रीडा क्षेत्राला नवी ऊर्जा मिळाली असून, शाळा, क्रीडा अकॅडमी आणि गोटाळ पांजरी परिसराचा गौरव राष्ट्रीय स्तरावर उंचावला आहे. समृद्धीच्या या यशामागे तिची मेहनत, खेळाप्रती असलेली निष्ठा आणि सातत्यपूर्ण प्रशिक्षण यांचा मोलाचा वाटा आहे.

या दैदीप्यमान यशाबद्दल बेटियां शक्ती फाउंडेशन, वंदे मातरम् स्पोर्ट्स अकॅडमी, माँटफोर्ट स्कूल नागपूरचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, क्रीडा क्षेत्रातील मान्यवर तसेच गोटाळ पांजरी परिसरातील नागरिकांनी समृद्धीचे मनःपूर्वक अभिनंदन केले. तिच्या पुढील क्रीडा वाटचालीसाठी शुभेच्छांचा वर्षाव होत असून, भविष्यातही ती अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये यश संपादन करून देशाचे नाव उज्ज्वल करेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

समृद्धीची ही सुवर्णकामगिरी केवळ पदकांची कमाई नाही, तर स्वप्न पाहणाऱ्या प्रत्येक युवा खेळाडूसाठी प्रेरणेचा नवा अध्याय आहे!

Popular Articles