– गोर सेना राष्ट्रीय अध्यक्ष प्रा संदेश चव्हाण यांचा आमरण उपोषणाचाही इशारा!
नागपूर :- गोरबंजारा समाजाला अनुसूचित जमाती (एसटी) प्रवर्गातून आरक्षण देण्याच्या मागणीने पुन्हा एकदा जोर धरला आहे. या मागणीसाठी सकल गोरबंजारा समाजाच्या वतीने छत्रपती संभाजीनगर ते नागपूर अशी भव्य आरक्षण रथयात्रा काढण्यात येणार आहे. ५ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता छत्रपती संभाजीनगर येथील सिडको बसस्थानक परिसरातील वसंतराव नाईक यांच्या पुतळ्यापासून या रथयात्रेला सुरुवात होणार आहे.जालना, सिंदखेड राजा, मेहकर, मालेगाव, वाशिम, पुसद, दिग्रस, दारव्हा, यवतमाळ आणि वर्धा मार्गे प्रवास करत ही रथयात्रा ७ डिसेंबर रोजी नागपुरात दाखल होणार आहे. त्यानंतर नागपुरात होणाऱ्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान ८ डिसेंबर रोजी गोरबंजारा समाजाच्या वतीने भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे. त्यानंतर धरणे आंदोलन आणि आमरण उपोषण करण्यात येणार असल्याची माहिती गोर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. संदेश चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिली. गोरबंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावे, ही मागणी गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. आरक्षणाबाबत अंतिम निर्णय होईपर्यंत आदिवासी विकास विभागांतर्गत अनुसूचित जमातींसाठी राबविण्यात येणाऱ्या सर्व शासकीय योजना, सुविधा आणि सवलती गोरबंजारा समाजालाही लागू कराव्यात, अशी प्रमुख मागणी आंदोलकांनी केली आहे. तसेच न्यायमूर्ती तहलियानी समितीचा अहवाल केंद्र सरकारकडे तातडीने पाठविण्यात यावा, अशीही मागणी करण्यात आली आहे. या मागण्यांसाठी समाजाच्या वतीने यापूर्वी अनेक आंदोलने, मोर्चे, उपोषणे आणि निवेदने देण्यात आली आहेत. मात्र, अद्याप ठोस निर्णय झालेला नसल्याने आता व्यापक जनआंदोलन उभारण्याचा निर्धार सकल गोरबंजारा समाजाने केला आहे. या आंदोलनात समाजातील सर्व बांधव, भगिनी, युवक, सामाजिक संघटना तसेच समाजहितासाठी कार्य करणाऱ्या संस्थांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. पत्रकार परिषदेला गोर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. संदेश चव्हाण, आरक्षण अभ्यासक प्रा. मोहन चव्हाण, आत्माराम चव्हाण नायक (नागपूर), बी. डी. चव्हाण नायक (नागपूर), तांडा सुधार समितीचे अध्यक्ष प्रा. नामा जाधव, गोविंद राठोड, प्रकाश राठोड, गोर सेनेचे नागपूर उपविभागीय अध्यक्ष कैलास राठोड, गोर सेनेचे सचिव श्याम चव्हाण, नागपूर अध्यक्ष कुणाल जाधव, अकोला अध्यक्ष कुलदीप चव्हाण, दिनेश जाधव, राजू रताने, अरविंद पवार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.






