spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

जीजामाता विद्यालयात विधी सेवा दिनानिमित्त कायदेविषयक जनजागृती!

– विद्यार्थ्यांना नशामुक्ती, आरोग्य आणि कायद्याच्या महत्त्वाबाबत मान्यवरांचे मार्गदर्शन

खापा, वार्ताहर :- विद्यार्थ्यांमध्ये कायद्याविषयी जागरूकता निर्माण करण्यासोबतच अमली पदार्थांच्या दुष्परिणामांची माहिती देऊन व्यसनमुक्त समाजाचा संदेश देण्याच्या उद्देशाने जीजामाता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, खापा येथे सोमवार, दिनांक २३ नोव्हेंबर २०२६ रोजी विधी सेवा दिनानिमित्त विशेष जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. भारत योजना २०२६ अंतर्गत आयोजित या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना कायदेविषयक माहिती, आरोग्याचे महत्त्व आणि नशामुक्त जीवनाबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष तथा दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ स्तर), सावनेर येथील माननीय एम. जे. मोहोड होते. यावेळी मार्गदर्शन करताना त्यांनी कायद्याचे महत्त्व स्पष्ट केले. कायदा हा केवळ शिक्षा देण्यासाठी नसून नागरिकांचे अधिकार, संरक्षण आणि सन्मान जपण्यासाठी असल्याचे सांगत प्रत्येक नागरिकाने आपल्या अधिकारांसोबतच कर्तव्यांचीही जाणीव ठेवावी, असे आवाहन केले.

प्रमुख अतिथी म्हणून विद्यालयाचे पालक संचालक चंद्रशेखर बरेठिया उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना शिस्त, संस्कार आणि व्यसनमुक्त जीवनाचे महत्त्व पटवून देत नशामुक्त समाजनिर्मितीसाठी तरुण पिढीने पुढाकार घेण्याचे आवाहन केले.

याप्रसंगी तालुका वकील संघ, सावनेरचे सचिव ए. वाय. निंबाळकर, पंचायत समिती सावनेरचे विस्तार अधिकारी पी. बी. मुंढे, दिवाणी न्यायालय सावनेर येथील अधिवक्ता यू. आर. पवार, प्राथमिक आरोग्य केंद्र खापा येथील आरोग्य अधिकारी डॉ. दिशा भिरड तसेच विद्यालयाचे प्राचार्य सुधाकर गजभिये यांची प्रमुख उपस्थिती होती.

व्यसनांपासून दूर राहण्याचे विद्यार्थ्यांना आवाहन

उपस्थित मान्यवरांनी अमली पदार्थांच्या सेवनामुळे होणारे शारीरिक, मानसिक व सामाजिक दुष्परिणाम विद्यार्थ्यांच्या निदर्शनास आणून दिले. व्यसनामुळे केवळ व्यक्तीचेच नव्हे, तर संपूर्ण कुटुंबाचे आणि समाजाचे नुकसान होते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी व्यसनांपासून दूर राहून शिक्षण, आरोग्य आणि उज्ज्वल भवितव्याला प्राधान्य द्यावे, असे आवाहन करण्यात आले. एक युवक व्यसनापासून दूर राहिला, तर एक संपूर्ण कुटुंब व्यसनाच्या विळख्यातून वाचू शकते, हा महत्त्वपूर्ण संदेशही यावेळी देण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य सुधाकर गजभिये यांनी केले, तर सूत्रसंचालन वर्षा सेलोकर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी पंकज बावनकर, रचना मोहने, निकिता सहारे, रीता तुमाने, प्रफुलकुमार वडे यांच्यासह विद्यालयातील शिक्षकवृंद, पंचायत समितीचे कर्मचारी आणि न्यायालयीन कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

कार्यक्रमाचा समारोप पी. एन. सोनकुसळे यांनी मानलेल्या आभार प्रदर्शनाने झाला. विद्यार्थ्यांमध्ये कायदेविषयक जागरूकता निर्माण करण्यासोबतच निरोगी आणि व्यसनमुक्त जीवनाची प्रेरणा देणारा हा उपक्रम ठरला.

Popular Articles