spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

थकीत मानधनासाठी ३० हजारांची मागणी; २५ हजारांची लाच घेताना प्राचार्या

– चंद्रपूर एसीबीची पोंभुर्णा आयटीआयमध्ये कारवाई

– महिला निदेशकाच्या तक्रारीवरून दोघांना अटक

चंद्रपूर :- कर्मचाऱ्यांचे थकीत मानधन मंजूर करून देण्याच्या मोबदल्यात लाचेची मागणी केल्याचा प्रकार पोंभुर्णा येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत (आयटीआय) उघडकीस आला आहे. तासिका तत्त्वावर कार्यरत महिला शिल्प निदेशकाचे पाच महिन्यांचे थकीत मानधन काढून देण्यासाठी ३० हजार रुपयांची मागणी करण्यात आली होती. तडजोडीनंतर २५ हजार रुपये स्वीकारताना प्राचार्या आणि कनिष्ठ लिपिकाला चंद्रपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सोमवारी (२३ नोव्हेंबर) रंगेहात पकडले.

कल्पना संजय खोब्रागडे (५५), प्राचार्या आणि नरेंद्र चंद्रशेखर मलीक (४७), कनिष्ठ लिपिक अशी कारवाई करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांची नावे आहेत.

थकीत मानधनाच्या मोबदल्यात लाचेची मागणी

या प्रकरणातील महिला तक्रारदार पोंभुर्णा आयटीआयमध्ये तासिका तत्त्वावर शिल्प निदेशक म्हणून कार्यरत आहेत. त्या वायरमन विषयाचे सैद्धांतिक आणि प्रात्यक्षिक प्रशिक्षण देतात. त्यासाठी त्यांना अनुक्रमे प्रतितास २५० आणि १२५ रुपये मानधन दिले जाते. मे, जून, ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर २०२६ या पाच महिन्यांचे मानधन नोव्हेंबरमध्ये त्यांच्या खात्यात जमा झाले होते.

हे थकीत मानधन मिळवून दिल्याच्या मोबदल्यात प्राचार्या कल्पना खोब्रागडे यांनी कनिष्ठ लिपिक नरेंद्र मलीक याच्यामार्फत ३० हजार रुपयांची मागणी केल्याचा आरोप आहे. लाच देण्याची इच्छा नसल्याने महिला निदेशकाने २१ नोव्हेंबर रोजी चंद्रपूर एसीबी कार्यालयात तक्रार दाखल केली.

२५ हजारांची रक्कम स्वीकारताच कारवाई

तक्रारीच्या अनुषंगाने एसीबी पथकाने २२ नोव्हेंबर रोजी पंचांसमक्ष पडताळणी केली. यावेळी प्राचार्यांनी ३० हजार रुपयांची मागणी कायम ठेवत तडजोडीनंतर २५ हजार रुपये स्वीकारण्याची तयारी दर्शवली. ही रक्कम कनिष्ठ लिपिक नरेंद्र मलीक याच्याकडे देण्यास सांगण्यात आले.

त्यानुसार सोमवारी आयटीआय कार्यालय परिसरात एसीबीने सापळा रचला. ठरल्याप्रमाणे २५ हजार रुपये स्वीकारताच पथकाने दोघांविरुद्ध कारवाई केली. या घटनेमुळे शैक्षणिक व प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. ही कारवाई चंद्रपूरचे पोलिस उपअधीक्षक अनिल जिट्टावार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक तेजराम मेश्राम, पोलिस निरीक्षक प्रशांत केदार आणि त्यांच्या पथकाने केली. या पथकात मनोज रामटेके, हिवराज नेवारे, रविकांत इंगळे, अमोल सिडाम, राकेश जांभुळकर, प्रदीप ताडाम, महेश माहुरपवार, ज्ञानेश्वर डोकळे, सचिन गजभिये, सीमा झाडे, सतीश सिडाम आणि संदीप कवरासे यांचा समावेश होता.

Popular Articles