चंद्रपूर :- कापूस व धान पिकांचे वन्यप्राण्यांपासून संरक्षण करण्यासाठी शेतात लावलेल्या विद्युत प्रवाहाच्या धक्क्याने अस्वलासह तिच्या चार महिन्यांच्या पिलाचा मृत्यू झाल्याची घटना चिमूर बीटातील चिमूर तालुक्यातील कवडशी शेत शिवारात सोमवारी उघडकीस आली आहे.
धान पिकांच्या संरक्षणासाठी तार व विद्युत प्रवाह
तळोधी नाईक येथील रहिवासी फकीरा रणदिवे यांनी चिमूर येथील यादव गोठे यांचे कवडशी येथील शेत भाड्याने घेतले होते. या शेतातील कापूस व धान पिकांच्या संरक्षणासाठी तार लावला होता त्यात विद्युत प्रवाह सोडण्यात आला होता.त्या ताराचं स्पर्श होऊन अस्वल व तिच्या पिलाचा मृत्यू झाला. दरम्यान, अस्वलाची दोन पिले झाडावर चढल्याची माहिती वनविभागाला मिळाली. त्यानुसार वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी पोहोचले व त्या दोन पिलाना फटाके फोडून खाली उतरविले दरम्यान वनकर्मचारी शेताची पाहणी करत असताना त्यांना एक अस्वल आणि तिचे सुमारे चार महिन्यांचे पिल्लू मृतावस्थेत आढळून आले.
संबंधित व्यक्तीविरुद्ध वनविभागाकडून कारवाई
घटनेची माहिती मिळताच सहायक वनसंरक्षक महेश गायकवाड, वनपरिक्षेत्र अधिकारी किशोर देऊळकर, मानद वन्यजीव रक्षक अमोद गौरकर, क्षेत्रपाल निशा राठोड तसेच महावितरणचे अभियंता सुमित दडमल यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. मृत अस्वल व पिल्लाला शवविच्छेदनासाठी खडसंगी येथे पाठविण्यात आले आहे. पिकांच्या संरक्षणासाठी बेकायदेशीररित्या विद्युत प्रवाह लावल्यामुळे वन्यप्राण्यांचा जीव धोक्यात येत असल्याचे या घटनेतून पुन्हा स्पष्ट झाले आहे. या प्रकरणी संबंधित व्यक्तीविरुद्ध वनविभागाकडून पुढील कारवाई केली जाण्याची शक्यता आहे.






