गडचिरोली :- नातेवाइकाकडे जेवणासाठी निघालेल्या दोन मित्रांवर पुलखल फाट्याजवळ काळाने घाला घातला. चंद्रपूर मार्गावरील एका राईस मिलसमोर रविवारी, २२ नोव्हेंबर रोजी रात्री पावणेदहा वाजेच्या सुमारास भरधाव कारने दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात दुचाकीवरील दोघेही गंभीर जखमी झाले. त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. जेवणाच्या कार्यक्रमाला पोहोचण्यापूर्वीच दोघांचा प्रवास मृत्यूने संपविला.
सुरेश डोकाजी भांडेकर (६२), दिवाकर बाबुराव म्हशाखेत्री (५५ ) दोघेही (रा. वाघोली बुटी ता. सावली जि. चंद्रपूर) अशी मृतांची नावे आहेत. हे दोघे मित्र २२ रोजी रात्री साडेआठ वाजता आपल्या गावातून पुलखल (ता. गडचिरोली ) येथे नातेवाईकाकडे जेवणासाठी एमएच-३४/सी-७९११ क्रमांकाच्या दुचाकीवरुन जात होते. दोन्ही वाहने व्याहाडच्या दिशेने येत असताना पुलखल फाट्याजवळ दुचाकी पुलखलकडे वळत होती. याचवेळी पाठीमागून भरधाव वेगाने येणाऱ्या एमएच-४९/बीझेड- ५३४० क्रमांकाच्या कारने दुचाकीला जोरदार धडक दिली. अपघात एवढा भीषण होता की, दुचाकीवरील दोघेही रस्त्याच्या कडेला असलेल्या गिट्टीच्या ढिगाऱ्यावर फेकले गेले. सुरेश भांडेकर यांचा उजवा पाय गुडघ्यापासून तुटून वेगळा झाला, तर दोघांच्याही डोक्याला गंभीर दुखापत झाली. दुचाकीचा चक्काचूर झाला. धडकेनंतर कारही रस्त्याच्या कडेला गवतात आडवी पडली. अपघातानंतर कारचालक घटनास्थळावरून पसार झाला.
पाच मिनिटांच्या अंतराने मालवली प्राणज्योत
घटनेची माहिती मिळताच पोलिसांसह नागरिकांनी जखमींना रुग्णवाहिकेने जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी सुरेश भांडेकर व दिवाकर म्हशाखेत्री या दोघांनाही काही अंतराने मृत घोषित केले.
कारचालक भंडारा जिल्ह्यातील
याप्रकरणी दीपक सुरेश भांडेकर यांच्या तक्रारीवरून गडचिरोली पोलिस ठाण्यात कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कारचालकाचे नाव अर्चीश गोविंद बडवाईक (रा. गोवर्धन नगर, तुमसर जि. भंडारा) असे निष्पन्न झाले असून पुढील तपास पोलिस निरीक्षक विनोद चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.






