spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

पत्रकार’ असल्याची बतावणी करून घरात घुसून चित्रीकरण; विनयभंग व खंडणीप्रकरणी सलीम मन्यारवर गुन्हा दाखल

– सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी; दरमहा २ हजारांची मागणी

पांढरकवडा :- ‘पत्रकार’ असल्याची बतावणी करत महिलेच्या घरात घुसून मोबाईलवर चित्रीकरण करणे, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत दरमहा दोन हजार रुपयांची खंडणी मागणे आणि महिलेचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार केळापूर तालुक्यातील धारणा येथे उघडकीस आला आहे. या प्रकरणी पांढरकवडा येथील सलीम मन्यार (वय ५०) याच्याविरुद्ध पांढरकवडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांत दाखल तक्रारीनुसार, २१ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ ते १२.३० वाजताच्या सुमारास आरोपी सलीम मन्यार हा एका अनोळखी व्यक्तीसोबत धारणा येथील फिर्यादी महिलेच्या घरी गेला. दोघांनी मोबाईलवरून घराचे चित्रीकरण सुरू केले. याबाबत विचारणा केल्यानंतर आपण पांढरकवड्यातील पत्रकार असल्याचे सांगत घरात दारू विक्री होत असल्याचा व्हिडिओ तयार करून तो फेसबुक, व्हॉट्सॲप आणि इन्स्टाग्रामवर व्हायरल करण्याची धमकी देण्यात आल्याचा आरोप आहे.

व्हिडिओ व्हायरल होऊ द्यायचा नसेल, तर दरमहा दोन हजार रुपये द्यावे लागतील, अशी मागणी आरोपीने केल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. तसेच फिर्यादी महिलेचा हात पकडून तिचा विनयभंग केल्याचाही आरोप आहे. याशिवाय, महिलेच्या पतीबाबत दारू विक्रीचा खोटा मजकूर इन्स्टाग्रामवर प्रसारित करून बदनामी केल्याचेही तक्रारीत म्हटले आहे.

संबंधित आरोपीचे नाव यापूर्वी रेती तस्करीच्या प्रकरणांशी जोडले गेले असून, त्याच्यावर यापूर्वी तडीपारीची कारवाई झाली असल्याचीही चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर या गंभीर प्रकरणाची सखोल चौकशी करून आरोपीच्या मागील गुन्हेगारी पार्श्वभूमीचीही पडताळणी व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

या प्रकरणी पांढरकवडा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ७४, ३२९(४), ३१८(३), ३१८(४), ३५१(२), ३५१(३), ३५६(२) आणि ३(५) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पुढील तपास पांढरकवडा पोलीस करीत आहेत.

प्रतिष्ठेला तडा देणाऱ्या कृत्यांवर कठोर कारवाईची मागणी

पत्रकारितेच्या नावाखाली धमकी, खंडणीखोरी आणि महिलांचा छळ करण्याचे प्रकार समोर येत असल्यास त्याची निष्पक्ष व सखोल चौकशी होणे आवश्यक आहे. पत्रकारितेच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचवणाऱ्या कथित कृत्यांवर कायद्यानुसार कठोर कारवाई होणार का, याकडे आता परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Popular Articles