मुंबई :- विकास प्रकल्पांसाठी हिरवळ कमी करताना वृक्षारोपण ही केवळ कागदोपत्री औपचारिकता ठरू नये. प्रकल्पाची आखणी करतानाच पर्यावरणाची भरपाई करण्यासाठी वृक्षलागवडीची पावले उचलली पाहिजेत, असे स्पष्ट करत मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला आधी वृक्षारोपण करा आणि त्यानंतर विकास प्रकल्पांच्या परवानगीसाठी या, अशी सूचना केली. वृक्षलागवडीचे आश्वासन देण्यापेक्षा प्रत्यक्षात किती झाडे लावली आणि त्यातील किती जगली, हे महत्त्वाचे असल्याचे न्यायालयाने म्हटले.
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) वांद्रे-कुर्ला संकुलातील (बीकेसी) ८.८५ किलोमीटर लांबीच्या उन्नत स्वयंचलित रॅपिड ट्रान्झिट सिस्टीम अर्थात पॉड कार प्रकल्पासाठी कांदळवन क्षेत्रातील ०.२८६९ हेक्टर जमीन वळती करण्याची परवानगी मागितली आहे. या याचिकेवर मुख्य न्या. महेश चंद्र त्रिपाठी आणि न्या. अद्वैत सेठना यांच्या खंडपीठासमोर बुधवारी सुनावणी झाली.
१०० झाडांची हमी
प्रकल्पाच्या मार्गात सहा झाडे बाधित होत आहेत. त्याच्या बदल्यात १०० झाडे लावण्याची हमी एमएमआरडीएने दिली आहे. प्रकल्पामुळे शेवटच्या टप्प्यातील वाहतूक जोडणी अधिक सुलभ होणार असल्याचा युक्तिवाद एमएमआरडीएच्या वतीने केला. मात्र, प्रकल्पाची संकल्पना तयार झाल्यापासूनच पर्यावरण संरक्षण करण्यासाठी प्रयत्न का केले नाहीत, असा सवाल खंडपीठाने केला. झाडांना वाढण्यासाठी वेळ लागतो. त्यामुळे प्रकल्पासाठी परवानगी मागण्यापूर्वीच पर्यावरण संतुलन राखण्याच्या दृष्टीने प्रामाणिक प्रयत्न का केले नाहीत, अशी विचारणा न्यायालयाने केली.
परवानगी कशी द्यायची?
वृक्षाच्छादनाचे प्रमाण ३० टक्के राखण्याची आवश्यकता असल्याचे कागदोपत्री सांगितले जात असताना प्रत्यक्षात वृक्षलागवड झालेली नसेल, तर परवानगी कशी द्यायची, असा सवालही न्यायालयाने उपस्थित केला. कागदावर आकडेवारी दाखवून चालणार नाही, तर प्रत्यक्ष परिस्थिती दिसली पाहिजे, असे खंडपीठाने स्पष्ट केले.






