– कृषी विस्तार अधिकाऱ्याचा प्रताप
वर्धा :- देवळी पंचायत समितीत शासकीय निधीचा अपहार केल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. ‘धडक सिंचन विहीर’ कार्यक्रमांतर्गत आलेला तब्बल २३ लाख २० हजार ६ रुपये इतका निधी कृषी विस्तार अधिकाऱ्यांनी गटविकास अधिकाऱ्यांच्या बनावट स्वाक्षरीद्वारे हडपल्याचे समोर आले असून याप्रकरणी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण यांच्याकडे प्रस्ताव सादर करुन कृषी विस्तार अधिकाऱ्याविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्याची परवानगी मागितली आहे.
जिल्हा परिषदेच्या अंतर्गत कार्यरत अधिकारी, कर्मचाऱ्यांनी सध्या शासकीय निधी हडपण्याचा कार्यक्रमच सुरु केल्याचे दिसून येत आहे. नुकताच समुद्रपूरच्या एकात्मिक बाल विकास प्रकल्पातील कनिष्ठ लिपिकाने ‘सॅलरी स्कॅम’ आणि बचत गटाची रक्कम हडपून ७३ लाखांचा घोटाळा केल्याचे प्रकरण ताजे असतानाच आता देवळी पंचायत समितीतील कृषी विस्तार अधिकारी दिनेश दखने यांनी देवळीचे गटविकास अधिकारी प्रफुल्ल लोखंडे यांची बनावट स्वाक्षरी करुन ‘धडक सिंचन विहीर’योजनेंतर्गत आलेला २३ लाख २० हजार ६ रुपयांचा निधी स्वतःच्या खात्यात वळता केल्याचे समोर आले आहे. खुद्द शासकीय अधिकाऱ्यानेच सरकारी तिजोरीवर डल्ला मारल्याचे उघड झाल्याने प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. आता जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यावर काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
कसा झाला अपहार?
भारतीय स्टेट बँकेच्या (SBI) देवळी शाखेतील खाते क्रमांक ४२६१६९१०७७० चे धनादेश पुस्तक विस्तार अधिकारी दिनेश दखने यांनी परस्पर आपल्या ताब्यात घेतले. त्यानंतर गटविकास अधिकारी, पंचायत समिती देवळी यांची बनावट स्वाक्षरी करून खात्यातून २३ हजार २० हजार ६ रुपये काढून शासकीय रकमेची अफरातफर केल्याचे समोर आले आहे.
तक्रारीनंतर फुटले बिंग
देवळी पंचायत समितीचे लेखा विभाग आणि रोखपाल अंकीत पारीसे यांनी १९ नोव्हेंबर २०२६ रोजी या प्रकरणाची लेखी तक्रार दिली होती. त्यानंतर २२ नोव्हेंबर रोजी देवळी पोलिस स्टेशनमध्येही या संदर्भात अर्ज सादर करण्यात आला. प्रशासनाने केलेल्या प्राथमिक चौकशीत हा अपहार झाल्याचे निदर्शनास आल्याने, चौकशी अहवाल आणि बँकेच्या विवरणपत्रासह २३ नोव्हेंबर २०२६ रोजी हा प्रस्ताव जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे पाठवण्यात आला आहे.






