spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

अमरावतीच्या इर्विन रुग्णालय परिसरात मानवी अवयव आढळल्याने खळबळ

– दोन हात, एक पाय आणि डोके सापडले

अमरावती :- जिल्हा सामान्य रुग्णालय अर्थात इर्विन रुग्णालयाच्या परिसरात मानवी शरीराचे छिन्नविच्छिन्न अवयव आढळून आल्याने गुरुवारी एकच खळबळ उडाली. रुग्णालयाच्या वेगवेगळ्या ठिकाणी दोन हात, एक पाय आणि मानवी डोके आढळले. यातील काही अवयव कुत्रे ओढत असल्याचेही समोर आले. या प्रकारामुळे रुग्णालयातील कर्मचारी, रुग्णांचे नातेवाईक आणि परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रुग्णालयातील वॉर्ड क्रमांक ९ समोर कुत्र्यांनी मानवी शरीराचा एक पाय आणून टाकला होता. कुत्रे त्या अवयवाचे लचके तोडत असल्याचे कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर परिसराची पाहणी केली असता इतर ठिकाणीही मानवी शरीराचे अवयव आढळून आले. वॉर्ड क्रमांक ५१ आणि १० यांच्या दरम्यान असलेल्या नालीत शरीरापासून वेगळे झालेले एक हात आणि डोके मिळाले. तर रुग्णालयाच्या इमारतीच्या मागील बाजूस आणखी एक हात आढळून आला.

एकाच रुग्णालय परिसरात अशा प्रकारे मानवी शरीराचे चार अवयव वेगवेगळ्या ठिकाणी आढळल्याने अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. हे अवयव नेमके कोणाचे आहेत, संबंधित व्यक्ती स्त्री आहे की पुरुष, तसेच ते रुग्णालय परिसरात कसे पोहोचले, याबाबत अद्याप कोणतीही स्पष्ट माहिती समोर आलेली नाही.

घटनेची माहिती मिळताच सिटी कोतवाली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी परिसराची पाहणी करून तपास सुरू केला आहे. या अवयवांचा उगम आणि ते रुग्णालय परिसरात येण्यामागील कारण शोधण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे. रुग्णालयासारख्या संवेदनशील ठिकाणी घडलेल्या या प्रकारामुळे प्रशासनाच्या व्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Popular Articles