spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

वैनगंगा पुलावरील ट्रक लुटमार व ‘मकोका’ प्रकरण: ११ महिन्यांपासून फरार दोन आरोपींना दोन दिवसांत अटक

हंसराज, भंडारा :- वैनगंगा नदीच्या पुलावर ट्रक अडवून चालकाला लाकडी दांड्यांनी मारहाण करत जबरी लूट आणि वाहनाची तोडफोड केल्याप्रकरणी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियमांतर्गत (मकोका) कारवाई करण्यात आलेल्या व गेल्या ११ महिन्यांपासून फरार असलेल्या दोन आरोपींना भंडारा पोलिसांनी अवघ्या दोन दिवसांत वेगवेगळ्या ठिकाणांहून जेरबंद केले आहे. विशेष नियोजन आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी ही धडक कारवाई केली.

दि. १७ डिसेंबर २०२५ रोजी रात्री १.३० वाजताच्या सुमारास फिर्यादी अकरम खान उसन खान पठाणे (वय ४५, रा. हासन, राज्य कर्नाटक) हे ट्रक क्रमांक (KA-18-C-4845) घेऊन रायपूर ते नागपूर मार्गाने जात होते. त्यावेळी ग्राम कोरभी जवळील वैनगंगा नदीच्या पुलावर आरोपी चिराग नमोद गजभिये (रा. रमाबाई आंबेडकर वार्ड, भंडारा), मोनार्च प्रकाश शेंडे (रा. विद्यानगर गणेशपूर, भंडारा), अस्मित उर्फ रामा रामेश्वर कुकडे (रा. वडोदा, ता. मौदा, जि. नागपूर) आणि त्यांच्या इतर १२ साथीदारांनी ट्रक अडवला. आरोपींनी लाकडी दांड्यांनी ट्रकच्या काचा फोडून अंदाजे ५० हजार रुपयांचे नुकसान केले, तसेच चालकाला जबरदस्तीने खाली उतरवून मारहाण करत त्यांच्या खिशातील १५ हजार रुपये जबरीने हिसकावून घेतले. याप्रकरणी भंडारा पोलीस ठाण्यात (अप.क्र. १७२३/२०२५)कलम ३१०(२), ३११, १२६(२), ३२४(४)दरोडा, जबरी लूट व तोडफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासादरम्यान आरोपींच्या संघटित गुन्हेगारी कारवाया समोर आल्याने या गुन्ह्यात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम, १९९९ चे कलम ३(१)(पप ), ३(२) आणि ३(४) अन्वये वाढ करण्यात आली आहे.

गुन्हा दाखल झाल्यापासून मोनार्च प्रकाश शेंडे (वय २५) आणि अस्मित उर्फ रामा रामेश्वर कुकडे हे दोघेही पोलिसांना वारंवार हुलकावणी देत फरार होते. पोलीस त्यांचा कसून शोध घेत असताना दि. २४ नोव्हेंबर २०२६ रोजी आरोपी अस्मित कुकडे हा मौजा वडोदा (ता. मौदा, जि. नागपूर) येथे असल्याची गोपनीय माहिती प्राप्त झाली. त्यानुसार वरिष्ठांच्या परवानगीने स्थानिक मौदा पोलिसांच्या मदतीने सापळा रचून त्यास ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर लगेचच दि. २५ नोव्हेंबर २०२६ रोजी दुसरा फरार आरोपी मोनार्च शेंडे हा मौजा मेंढा (पोस्ट मानेगाव बाजार) येथील मंडई कार्यक्रमास येणार असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी मंडई परिसरात सापळा रचून गर्दीतून अत्यंत शिताफीने त्यास ताब्यात घेत अटक केली.

सलग दोन दिवसांत मकोका अंतर्गत कारवाई सुरू असलेल्या गंभीर गुन्ह्यातील दोन फरार आरोपींना अटक करण्यात भंडारा पोलिसांना यश आले आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक नूरूल हसन, अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे, सहायक पोलीस अधीक्षक तेजस सारडा व प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भंडारा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उल्हास भुसारी, सपोनि बोरकर, सपोनि खंदाडे, पोउपनि रोशन ओकटे, सहाय्यक फौजदार रोशन गजभिये, तुळशिदास मोहरकर, विजय राऊत तसेच पोलीस अंमलदार प्रशांत कुरजेकर, अंकोश पुराम, संदीप बंबावले, अनुप वालदे, रोहन काळे आणि वाडीभस्मे यांनी केली. संघटित गुन्हेगारीविरुद्ध कठोर पावले उचलत फरार आरोपींना कायद्याच्या कक्षेत आणण्याची पोलिसांची ही कारवाई गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींना स्पष्ट इशारा देणारी ठरली आहे.

Popular Articles