भंडारा :- बालकांच्या शैक्षणिक विकासाचा पाया रचणाऱ्या अंगणवाडी केंद्रांमध्येच पायाभूत सुविधांची उणीव असल्याचे चित्र आहे. जिल्ह्यातील तब्बल २४६ अंगणवाडी केंद्रांमध्ये अद्याप स्वतंत्र विद्युत व्यवस्था नाही. बालविकास योजनांची अंमलबजावणी करणाऱ्या या केंद्रांना मूलभूत सुविधांसाठी निधीची प्रतीक्षा करावी लागत आहे. विशेष म्हणजे, अंगणवाड्यांच्या वीज सुविधेसाठी जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.
जिल्ह्यातील सर्व १ हजार २५२ अंगणवाडी केंद्रांमध्ये स्वच्छतागृहांची व्यवस्था असल्याची विभागाची माहिती आहे. मात्र, स्वतंत्र स्वयंपाकघराची सुविधा १ हजार १९१ केंद्रांमध्येच उपलब्ध आहे. त्यामुळे उर्वरित केंद्रांमध्ये स्वतंत्र स्वयंपाकघराची सुविधाही उपलब्ध करून देण्याचे आव्हान आहे.
निधी उपलब्ध होण्याची प्रतीक्षा कायम
बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी अंगणवाडी केंद्रे महत्त्वाची भूमिका बजावत असताना, तेथील मूलभूत सुविधांची पूर्तता होणे गरजेचे आहे.
इमारतींचाही प्रश्न कायम
वीज सुविधेसोबतच अंगणवाडी इमारतींचा प्रश्नही पूर्णपणे सुटलेला नाही. जिल्ह्यातील १ हजार २५२ केंद्रांपैकी १ हजार २२१ केंद्रांना स्वतःच्या इमारती आहेत, तर ३१ केंद्रे भाड्याच्या इमारतीत सुरू आहेत. यापैकी १६ केंद्रांच्या नवीन इमारत बांधकामाला मंजुरी मिळाली असून काम प्रगतिपथावर आहे. आणखी चार केंद्रांच्या बांधकामाला २०२६-२७ या आर्थिक वर्षात मंजुरी देण्यात आली आहे. उर्वरित ११ केंद्रांसाठी नवीन इमारत बांधकाम मंजूर करण्याचे प्रस्तावित आहे.
जिल्हा नियोजन समितीकडे प्रस्ताव
अंगणवाडी केंद्रांमध्ये वीज व्यवस्था, इमारत बांधकाम आणि स्वच्छतागृहांसारख्या सुविधा उपलब्ध नसलेल्या ठिकाणांचा जिल्हास्तरीय आराखडा तयार करण्यात आला आहे. आवश्यक निधीसाठी आराखडा जिल्हा नियोजन समितीकडे सादर करण्यात आला आहे. निधी उपलब्ध होताच संबंधित केंद्रांमध्ये पायाभूत सुविधा निर्माण करण्याची कार्यवाही करण्यात येणार असल्याचे विभागाने स्पष्ट केले.






