– अमरावती सत्र न्यायालयाचा निकाल
अमरावती :- गार्डनमध्ये खेळणाऱ्या दोन अल्पवयीन मुलींसमोर अश्लील वर्तन करून त्यांचा विनयभंग केल्याप्रकरणी अतिरिक्त सत्र न्यायालयाने आरोपीला दीड वर्ष सक्तमजुरी आणि पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. शरद नामदेवराव तायडे (वय ५०, रा. विलास नगर, अमरावती) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश क्रमांक ६ अश्वघोष रामटेके यांनी शुक्रवारी हा निकाल दिला.
ही घटना २५ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी ५.३० ते ६ वाजताच्या दरम्यान गाडगेनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका कॉलनी परिसरात घडली होती. फिर्यादीची आठ वर्षीय मुलगी आणि तिची मैत्रीण गार्डनमध्ये खेळत असताना आरोपीने त्यांच्यासमोर अश्लील वर्तन करून त्यांना त्रास दिला. या घटनेनंतर फिर्यादीने दिलेल्या तक्रारीवरून २६ डिसेंबर रोजी गाडगेनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक वैशाली चव्हाण यांनी केला. तपासाअंती न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. खटल्यात सरकार पक्षातर्फे सरकारी अभियोक्ता गजानन पोकळे यांनी बाजू मांडली. कोर्ट पैरवी म्हणून हवालदार अरुण हटवार आणि ईश्वर राठोड यांनी सहकार्य केले.
न्यायालयाने पोक्सो कायद्याच्या कलम १२ अन्वये आरोपीला एक वर्ष सहा महिने सक्तमजुरी आणि पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास तीन महिने साध्या कारावासाची अतिरिक्त शिक्षा भोगावी लागणार आहे. आरोपी २६ डिसेंबर २०२५ पासून कारागृहात असल्याने बीएनएसएस कलम ४६८ नुसार त्याला यापूर्वीच्या न्यायालयीन कोठडीतील कालावधीची सवलत (सेट-ऑफ) मिळणार आहे.






