– ५१२ किलो मिठाई नष्ट, २.८८ लाखांचा साठा जप्त
पुणे :- विशेष तपासणी मोहिमेंतर्गत अन्न व औषध प्रशासनाच्या (एफडीए) पथकांनी शुक्रवारी (दि. २७), बुधवार पेठ परिसरातील मिठाई उत्पादन व विक्री करणाऱ्या आठ दुकानांची तपासणी केली. या कारवाईत ५१२ किलो, दोन लाख ८८ हजार २०० रुपये किमतीचा संशयित मिठाई साठा जप्त करून नाशवंत असल्याने जागेवरच नष्ट करण्यात आला. तसेच, मिठाई व दुग्धजन्य पदार्थांचे एकूण १७ नमुने विश्लेषणासाठी घेण्यात आले. दोन आस्थापनांमध्ये आवश्यक परवाना अथवा नोंदणीशिवाय व्यवसाय सुरू असल्याचे आढळले.
परिमंडळ ६ अंतर्गत श्रीमंत पेढेवाले या मिठाई दुकानातून मोतीचूर लाडू, खव्याचे मोदक आणि उकडीचे मोदक असे तीन नमुने घेण्यात आले. येथील २१५ किलो, एक लाख १८ हजार ८० रुपये किमतीची मिठाई नष्ट करण्यात आली. श्री मंगलमूर्ती या दुकानातून खव्याचे मोदक, तळलेले मोदक आणि बेसन लाडू असे तीन नमुने घेण्यात आले. येथील १९५ किलो, एक लाख १७ हजार रुपये किमतीचा मिठाई साठा नष्ट करण्यात आला. आवश्यक परवाना व नोंदणी नसल्याने या आस्थापनाला व्यवसाय बंद करण्याची नोटीस बजावण्यात आली.
हर्षवर्धन मिठाई उत्पादन केंद्र हे नोंदणी प्रमाणपत्राशिवाय कार्यरत असल्याचे तपासणीत आढळले. या प्रकरणी ३० नोव्हेंबर रोजी तडजोड अर्ज दाखल करण्यात येणार आहे. श्री कृपा दुग्धालयातून मलाई मोदक पेढा, केशरी मोदक पेढा, कंदी मोदक पेढा आणि सुटे म्हशीचे दूध असे चार नमुने विश्लेषणासाठी घेण्यात आले.
ही कारवाई सहआयुक्त (दक्षता) प्रीती टिपरे यांच्या मार्गदर्शनाखाली, सहायक आयुक्त (अन्न) ना. रा. सरकटे आणि सय्यद इम्रान हश्मी यांच्या मार्गदर्शनात तसेच सहआयुक्त (अन्न) श्रीकांत करकळे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.
या आस्थापनांमध्येही झाडाझडती
श्री मंगलमूर्ती (श्रीकृष्ण कॉम्प्लेक्स) आणि धारवाडी पेढे स्वीट्स अँड स्नॅक्स या आस्थापनांचीही तपासणी करण्यात आली. धारवाडी पेढे येथून मोतीचूर लाडू, खव्याचे मोदक आणि उकडीचे मोदक असे तीन नमुने घेण्यात आले. येथील ४३ किलो, २३ हजार ८४० रुपये किमतीची मिठाई नष्ट करण्यात आली.
परिमंडळ ८ अंतर्गत जय गणेश स्वीट सेंटर येथून खव्याचे मोदक, बेसन लाडू आणि मोतीचूर लाडू असे तीन नमुने घेण्यात आले. येथील ३५ किलो, २० हजार ४०० रुपये किमतीची मिठाई जप्त करण्यात आली. अथर्व स्वीट सेंटरमध्येही अस्वच्छता आढळल्याने खव्याच्या मोदकाचा नमुना घेण्यात आला. येथील २४ किलो, आठ हजार ८८० रुपये किमतीची मिठाई जप्त करण्यात आली.





