– अवघ्या एका महिन्यात घेतले २ लाखांचे विक्रमी उत्पन्न !
यवतमाळ :- सध्या संपूर्ण भागात भीषण पाणीटंचाई आणि दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्यामुळे पारंपारिक पिके अडचणीत आलेली असताना राळेगाव तालुक्यातील अंतरगाव येथील शेतकरी गजानन किसनराव बुरले यांनी रेशीम शेतीचा यशस्वी प्रयोग करुन दाखवला आहे.
रेशीम उद्योगाच्या माध्यमातून त्यांनी अवघ्या एका महिन्यात तब्बल १ लाख ९९ हजार २५० रुपयांचे उत्पन्न मिळवून इतर शेतक-यांसमोर एक नवा आदर्श निर्माण केला आहे.
अशी झाली सुरुवात
पारंपारिक पिकांना मिळणारा कमी दर आणि लहरी निसर्ग, सततची नापीकी यामुळे गजानन बुरले यांनी २०१८ मध्ये रेशीम शेतीकडे वळण्याचा निर्णय घेतला. त्यांनी यवतमाळ येथील जिल्हा रेशीम कार्यालयात संपर्क साधून शासकीय अनुदानाची माहिती घेतली आणि रितसर नोंदणी केली. सुरुवातीला त्यांनी १ एकर क्षेत्रावर तुतीची लागवड केली. पहिल्या वर्षी त्यांना २ बॅच मधून प्रति बॅच ५० ते ६० हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले. या यशामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढला आणि त्यांनी लागवड क्षेत्र २ एकरांपर्यंत वाढवले. आता ते वर्षातून ५ ते ६ बॅच यशस्वीरीत्या घेत आहेत आणि त्यातुन ७ ते ८ लाख उत्पन्न घेत आहे. घर बांधणेसाठी बँकेकडून कर्ज घेतले आहे ते रेशीम उद्योगातुन मीळणा-या पैश्यातुनच फेडने सुरु आहे.
एका महिन्यात लाखोंची कमाई
नुकत्याच घेतलेल्या बॅच मध्ये बुरले यांनी ३०० अंडीपुंजापासून २५० किलोग्रम रेशीम कोषाचे विक्रमी उत्पादन घेतले. २१ नॉव्हेंबर रोजी कर्नाटक राज्यातील सिदलघटटा येथील रेशीम कोष बाजारपेठेत त्यांनी या कोषाची विक्री केली. तिथे त्यांना प्रति किलो सरासरी ७९७ रुपये असा उत्तम दर मिळाला ज्यातून त्यांना एका महिन्यात १ लाख ९९ हजार २५० रुपयांचे घसघशीत उत्पन्न मिळाले.
मार्गदर्शन आणि कुटुंबाची साथ मोलाची
आपल्या यशाबद्यल बोलताना बुरले सांगतात की, ” दुष्काळात पाणी कमी पडल्यास इतर पिके पूर्णपणे वा जातात आणि शेतक-याचे संपुर्ण वर्ष वाया जाते. मात्र रेशीम शेतीत वातावरणातील बदलामुळे एखादी बॅच वाया गेली तरी पुढील दीड महिन्यात नवीन बॅच घेता येते, ज्यामुळे मोठे आर्थिक नुकसान टळते तसेच पारंपारीक पीकाचे तुलनेने रेशीम कोषाला मोठा भाव मिळतो आहे.” या प्रवासात रेशीम विभागाचे अधिकारी, कर्मचारी यांचे वेळोवेळी मोलाचे मार्गदर्शन लाभले तसेच पत्नीची खंबीर साथ मिळाल्यामुळेच तुती आणि रेशीम किटकांचे योग्य व्यवस्थापन करणे शक्य झाले आहे. दरवर्षी वर्षाकाठी किमान ७ ते ८ लाख रुपये रेशीम शेतीतुन उत्पन्न घेत असल्यामुळे रेशीम शेतीमुळे त्यांच्या कुटुंबाची आर्थिक स्थिती सुधारली असून ते आपल्या मुलांना चांगल्या दर्जाचे शिक्षण देऊ शकत आहेत.
इतर शेतक-यांना गजानन बुरले यांचा सल्ला
आपल्या यशाबद्दल बोलताना गजानन बुरले सांगतात सध्या नापिकी आणि कर्जबारीपणामुळे शेतकरी हताश होत आहेत. पण खचून न जाता शेती करण्याची पध्दत बदण्याची गरज आहे. रेशीम शेती ही शेतक-यांसाठी वरदान ठरणारा व्यवसाय आहे. यात दर दीड ते दोन महिन्याला हातात रोख पैसा येतो, त्यामुळे सावकाराचे किंवा बँकेचे कर्ज काढण्याची वेळ येत नाही. तरुण शेतक-यांनी नोकरीच्या मागे न लागता आधुनिक पध्दतीने रेशीम शेती केल्यास ते नक्कीच लखपती होऊ शकतात.
रेशीम विकास अधिका-यांकडून कौतुक व आवाहन
गजानन बुरले यांच्या या उल्लेखनीय यशाबद्यल सर्वत्र कौतुक होत असुन रेशीम विकास अधिकारी रजनी बन्सोड यांनी त्यांचे विशेष कौतुक केले आहे. इतर शेतक-यांनीही पारंपारिक पिकांसोबतच शासनाच्या अनुदान योजनांचा लाभ घेत रेशीम शेतीकडे वळावे आणि आपली आर्थिक स्थिती भक्कम करावी. असे आवाहन त्यांनी यावेळी केले.






