– क्रिप्टो टास्क फ्रॉडच्या जाळ्यात नागरिकाची फसवणूक
अमरावती :- क्रिप्टो गुंतवणुकीच्या नावाखाली फसवणूक झाल्याच्या अनेक घटना आजपर्यंत घडल्या आहे. अशीच एक घटना अमरावती जिल्ह्यात घडली आहे. ऑनलाइन टास्क आणि क्रिप्टो गुंतवणुकीच्या नावाखाली तरुणाची तब्बल ६ लाख ३ हजार ७३९ रुपयांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा अमरावती ग्रामीण सायबर विभाग आणि पथ्रोट पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी गुरुवारी दोन मुख्य आरोपींसह एका ‘म्युल’ खातेदाराला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. वरद सुधीर कपिले (रा. अमरावती), कार्तिक रमेश लांडगे (रा. अमरावती) आणि खात्याचा गैरवापर होण्यास कारणीभूत ठरलेला म्युल खातेदार सारंग प्रेमदास जोंधळे (रा. अमरावती) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
फिर्यादी वेदांत अनिल कळमकर (२५, पथ्रोट) यांना ४ जून २०२६ रोजी ‘ॲमेझॉन रँकिंग बीटूबी’चे टास्क पूर्ण करण्याचे आमिष दाखवण्यात आले. सुरुवातीला विश्वास संपादन करण्यासाठी त्यांच्या ॲक्सिस बँकेच्या यूपीआय खात्यावर १६० रुपयांचा बोनस पाठवण्यात आला. त्यानंतर त्यांना टेलिग्राम ग्रुपवर जोडून एका संशयास्पद लिंकवर लॉगिन करण्यास भाग पाडले गेले. वेगवेगळी टास्क पूर्ण करण्याच्या नावाखाली आणि ‘कॉइनबेस’ नावाच्या कंपनीत क्रिप्टो गुंतवणुकीचे आमिष दाखवत आरोपींनी फिर्यादीकडून टप्प्याटप्प्याने ६ लाख ३ हजार ७३९ रुपये उकळले.
असा लागला छडा
या तक्रारीवरून पथ्रोट पोलीस ठाण्यात फसवणुकीसह माहिती तंत्रज्ञान अधिनियमाच्या कलमाअन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. तांत्रिक तपासातून सायबर विभागाने आरोपींचा माग काढत ही कारवाई केली. पोलीस अधीक्षक निकेतन कदम यांच्या मार्गदर्शनाखाली ‘ऑपरेशन कवच’अंतर्गत सायबर गुन्ह्यांचा छडा लावणे आणि जनजागृतीवर भर दिला जात आहे. अपर पोलीस अधीक्षक दत्ता तोटेवाड व उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील हुड यांच्या मार्गदर्शनाखाली सायबरचे ठाणेदार अशोक लांडे, अंजनगाव सुर्जीचे ठाणेदार सुरज बोंडे व पथ्रोटचे ठाणेदार अभय चौथनकर यांच्या नेतृत्वात पोलिस पथकाने ही कामगिरी पार पाडली.
खाजगी माहिती देणे टाळा
अनधिकृत लिंक उघडू नयेत, ओटीपी तसेच बँक तपशील शेअर करू नयेत आणि पैशांच्या आमिषापोटी स्वतःचे बँक खाते, एटीएम किंवा सिमकार्ड इतरांना देऊ नये. तातडीने पोलिसांशी संपर्क साधावा.
– अशोक लांडे, ठाणेदार, सायबर






