spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

चंद्रपूर जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा; वर्धा नदीला पूर, प्रमुख रस्ते बंद

 

चंद्रपूर १९ : जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून अधूनमधून सुरू असलेला पाऊस आता मुसळधार रूप धारण करत असून, आजपासून जिल्ह्यात सलग आणि जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. सतत कोसळणाऱ्या पावसामुळे शहरातील अनेक सखल भागांमध्ये पाणी साचले असून, रस्त्यांमध्येही पावसाचे पाणी शिरले आहे. परिणामी नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

वर्धा नदीला आलेल्या पुरामुळे जिल्ह्यातील अनेक महत्त्वाचे रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. चंद्रपूरहून कोरपनाकडे जाणारा भोयेगाव रस्ता तसेच बल्लारपूर-राजुरा मार्गावर वाहतूक बंद करण्यात आली आहे. या स्थितीमुळे तेलंगणाकडे जाणारी वाहतूक पूर्णतः ठप्प झाली आहे. गोंडपिंपरी परिसरातून तेलंगणाला जोडणारा पोडासा रस्ताही बंद करण्यात आला आहे. दरम्यान, यवतमाळ आणि आदिलाबाद जिल्ह्यांतील सततच्या पावसामुळे वर्धा नदीचे पात्र तुडुंब भरून वाहत आहे. परिणामी चंद्रपूर जिल्ह्यातील अनेक रस्ते शनिवार रात्रीपासून बंद करण्यात आले आहेत, जरी काही भागांमध्ये आज दुपारी पाऊस थांबलेला होता. चंद्रपूर शहरात वाहणारी इराई नदीही धोका निर्माण करू शकते, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. वर्धा नदीने दोन दिशांनी प्रवाह वाढविल्याने, इराई नदीचे पाणी वाहून जाण्याची शक्यता कमी झाली आहे. यामुळे नदीच्या पात्रात उलट दाब निर्माण होऊन इराई नदीचे पाणी शहरात शिरण्याचा धोका वाढला आहे. जिल्हा प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून, संपूर्ण परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली असून, गरज भासल्यास मदतकार्य तत्काळ सुरू करण्यात येईल, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे..


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.