कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल; फार्मसी कॉलेज प्रशासनात खळबळ
नागपूर २१ : नागपूरमध्ये शिक्षणक्षेत्राला हादरवणारे धक्कादायक प्रकरण उघडकीस आले आहे. शहरातील सतचिकित्सा प्रसारक मंडळाचे अध्यक्ष गंगाधर नाकाडे यांच्याकडे ५ कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी करण्यात आली असून, मागणी न पूर्ण केल्यास संस्थेच्या आदर्श फार्मसी कॉलेजची बदनामी करण्याची धमकी देण्यात आली. या प्रकरणी होमिओपॅथी महाविद्यालयाचे माजी उपप्राचार्य डॉ. गोपाल राणीलालजी भुतडा (५२, रा. वाठोडा) यांच्याविरुद्ध कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
तक्रारदार गंगाधर नाकाडे (६०, रा. आनंद नगर, हुडकेश्वर रोड) हे सतचिकित्सा प्रसारक मंडळाचे अध्यक्ष आहेत. २०१२ पर्यंत संस्थेतर्फे होमिओपॅथी कॉलेज कार्यरत होते, जिथे आरोपी डॉ. भुतडा उपप्राचार्य म्हणून काम करत होते. कॉलेज बंद झाल्यानंतर नाकाडे यांनी बी.फार्म आणि डी.फार्म अभ्यासक्रमांसाठी परवानगी मिळवून आदर्श फार्मसी कॉलेज सुरू केले.
कॉलेज सुरू झाल्यानंतर, आरोपी डॉ. भुतडा यांनी सरकारी आणि खासगी विभागांमध्ये १००हून अधिक तक्रारी दाखल करून संस्थेची बदनामी करण्याचा प्रयत्न केला. सर्व चौकशीत या तक्रारी निष्फळ ठरल्या, तरी त्यांनी बदनामी थांबवली नाही. एवढेच नव्हे, तर त्यांनी वारंवार नाकाडे यांना प्रत्यक्ष भेटून आणि संदेशाद्वारे धमक्या देणे सुरू केले. “तुमचे कॉलेज बंद करून टाकीन”, “माझे जुने सहकारी व प्राचार्याचे कोट्यवधी रुपये बाकी आहेत, नाहीतर तुम्हीच पैसे द्या” अशा मागण्या आरोपीकडून करण्यात आल्या.
प्रकरणाने गंभीर वळण घेतले ते ३ जून २०२५ रोजी, जेव्हा आरोपीने संस्थेचे कर्मचारी कुणाल गायकवाड यांना भेटून सांगितले की,
“नाकाडे यांनी ५ कोटी रुपये आणून द्यावेत, मग मी सर्व तक्रारी बंद करीन; अन्यथा तुमच्या संस्थेला वाईट दिवस दाखवेन.”
या सततच्या धमक्या व खंडणीच्या मागण्यांमुळे संस्थेच्या व्यवस्थापनाने तातडीची बैठक घेऊन कोतवाली पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली. नाकाडे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी डॉ. गोपाल भुतडाविरुद्ध खंडणी, धमकी व संस्थेची बदनामी करण्याच्या कटाशी संबंधित गंभीर कलमांखाली गुन्हा नोंदवला आहे.



