मैत्रिणीच्या घरी राहायला गेली अन् घात झाला

0
43


महिला होमगार्डची निर्घृण हत्या; दोन आरोपींना अटक, तिघांचा शोध सुरू

बीड २२ – बीड शहरात महिला होमगार्डचा खून झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. काही दिवसांपूर्वी बेपत्ता झालेल्या अयोध्या व्हरकटे (रा. गेवराई) यांचा मृतदेह बीड शहरापासून 7 किमी अंतरावर असलेल्या नाल्यात सापडला. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, दोन संशयितांना अटक करण्यात आली आहे. उर्वरित तिघांचा शोध पोलीस घेत आहेत.

अयोध्या व्हरकटे या गेवराई येथे होमगार्ड म्हणून कार्यरत होत्या आणि सध्या महिला पोलीस भरतीसाठी सराव करत होत्या. काही दिवसांपूर्वी त्या घरातून बाहेर गेल्यानंतर परत न आल्याने कुटुंबीयांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात बेपत्ता तक्रार नोंदवली होती. काल पोलिसांनी राबवलेल्या शोधमोहीमेदरम्यान अयोध्याचा मृतदेह नाल्यात आढळून आला.

पोलिसांच्या तपासानुसार, अयोध्या यांना प्रथम गुंगीचे औषध देऊन बेशुद्ध करण्यात आले. त्यानंतर गळा दाबून त्यांचा खून करण्यात आला आणि पुरावे नष्ट करण्यासाठी मृतदेह नाल्यात टाकण्यात आला. प्राथमिक चौकशीत अयोध्या तीन दिवसांपूर्वी बीडमधील अंबिका चौक परिसरातील एका मैत्रिणीच्या घरी गेल्याचे निष्पन्न झाले आहे.

या प्रकरणात पोलिसांना अयोध्याच्या मैत्रिणीवर आणि तिच्यासोबत असलेल्या इतर चार जणांवर संशय आहे. पोलिसांनी त्वरीत कारवाई करून दोन संशयितांना अटक केली असून उर्वरित तिघांचा शोध सुरू आहे.

या खुनामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांकडून संशयितांची कसून चौकशी सुरू असून, मोबाईल लोकेशन, सीसीटीव्ही फुटेज आणि कॉल रेकॉर्ड्सच्या आधारे तपास वेगाने पुढे नेण्यात येत आहे. शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पथक या प्रकरणाचा सखोल तपास करत आहे.