खापा, २७ : खापा शहरातील कन्हान नदीवरील हनुमान घाट आणि लांबटपूरा घाट या दोन्ही घाटांवर उतरणाऱ्या रस्त्यावरील (रफटा) मोठ्या खड्ड्यांमुळे नागरिकांना प्रचंड अडचणींना सामोरे जावे लागत आहे. पुराच्या पाण्यामुळे घाटांवरील रस्त्याखालील माती वाहून गेल्याने हे खड्डे निर्माण झाले असून, त्यामुळे हरतालिका (गौरी पूजन), श्री गणेश विसर्जन आणि श्री नवदुर्गा विसर्जन यांसारख्या धार्मिक कार्यक्रमांमध्ये नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
या गंभीर परिस्थितीवर लक्ष वेधण्यासाठी आ. आशिषबाबू देशमुख यांच्या मौखिक आदेशानुसार मॉयल लिमिटेड, गुमगांव खान, खापा येथील प्रबंधकांना अधिकृत पत्राद्वारे तात्काळ उपाययोजना करण्याची विनंती करण्यात आली आहे.
पत्रात नमूद करण्यात आले आहे की, खापा शहराची लोकसंख्या सुमारे २५ हजार असून, येथील बहुतांश नागरिक हिंदू धर्मीय आहेत. या घाटांवर दरवर्षी मोठ्या प्रमाणात धार्मिक उत्सव साजरे होतात. परंतु, कन्हान नदीला आलेल्या पुरामुळे घाटांवरील रस्त्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
नागरिकांना सोयीस्करपणे विसर्जनासाठी घाटावर जाता यावे म्हणून मॉयल लिमिटेडकडून वेस्ट मटेरियल उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे. हे वेस्ट मटेरियल वापरून घाटावरील खड्डे बुजवले जाऊ शकतील आणि धार्मिक कार्ये कोणत्याही अडथळ्याविना पार पाडली जातील, असे पत्रात नमूद करण्यात आले आहे.
भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष (नागपूर ग्रामीण – काटोल) पियुष राजेंद्र बुरडे यांनीही ही मागणी समर्थन केली आहे. त्यांनी सांगितले की, “गणेशोत्सव आणि नवरात्र उत्सवाच्या काळात हजारो नागरिक घाटावर विसर्जनासाठी येतात. जर वेळेत दुरुस्तीचे काम करण्यात आले नाही, तर अपघातांची शक्यता वाढेल. त्यामुळे मॉयल लिमिटेडने तात्काळ वेस्ट मटेरियल उपलब्ध करून द्यावे, ही आमची ठाम मागणी आहे.”




