दोन गुन्हे उघड
नागपूर: जरीपटका पोलिसांनी घरफोडीच्या गुन्ह्यात सहभागी असलेल्या दोन आरोपींना अटक करून दोन गुन्हे उघडकीस आणले आहेत. आरोपींकडून एकूण ८,३१,४५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई तांत्रिक तपास आणि गुप्त माहितीच्या आधारे करण्यात आली.
९ ऑगस्ट २०२५ रोजी जरीपटका पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सुदर्शन कॉलनी, बेझनबाग येथील रहिवासी चंदा अर्जुन खरे (वय ५५) ह्या त्यांच्या कुटुंबासह रक्षाबंधनासाठी बाहेर गेल्या होत्या. याच संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने त्यांच्या घराचे कुलूप आणि कडीकोंडा तोडून घरात प्रवेश केला. कपाटातून ५०,०००/- रुपये रोख रक्कम, ८३ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आणि २ किलो २०० ग्रॅम चांदीचे दागिने असा एकूण ६,०५,००० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. या प्रकरणी जरीपटका पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपींविरुद्ध कलम ३०५(अ), ३३१(३), ३३१(४) भा.न्या.सं. अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्ह्याचा तपास करत असताना, जरीपटका पोलिसांच्या पथकाने तांत्रिक तपास आणि मिळालेल्या खात्रीशीर माहितीच्या आधारे आरोपींना निष्पन्न केले. पोलिसांनी असलम उर्फ आशू अब्दुल शरीफ खान (वय २४, रा. अमीत नगर, यशोधरानगर, नागपूर) आणि अरहंत उर्फ गोल्डी विजय गजभिये (वय १९, रा. रमाई बुध्द विहार जवळ, यशोधरानगर, नागपूर) यांना ताब्यात घेतले.
पोलिसी खाक्या दाखवताच आरोपींनी वरील गुन्हा केल्याची कबुली दिली. अधिक चौकशीत त्यांनी कपिलनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अंगुलीमाल नगर येथे राहणारे उमाशंकर विश्वकर्मा यांच्या घरी देखील चोरी केल्याचे सांगितले. पोलिसांनी आरोपींच्या ताब्यातून २ मोबाईल फोन, गुन्ह्यात वापरलेली दुचाकी अॅक्सेस गाडी (क्र. एम.एच. ४९ सि.एम. ३६८१) तसेच सोन्याचे दागिने, सोन्याची लगड आणि चांदीचे दागिने असा एकूण ८,३१,४५०/- रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
ही यशस्वी कामगिरी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण क्षिरसागर, सहायक पोलीस निरीक्षक आशिष मोरघडे, शशिकांत तायडे, पोलीस उपनिरीक्षक मारोती जांगीलवाड, पोलीस हवालदार पंकज ठाकुर, सुर्यकांत, पोलीस अंमलदार प्रमोद सलोडकर, मंगेश डोनाडकर, राहुल चौव्हाण, नितेश नागपूरे, पंकज वरखेडे, राकेश सिंग, शितेश चौरसिया आणि प्रताप शेळके यांनी पार पाडली. पुढील तपास सुरू आहे.




