४८ तासांत मुद्देमाल केला जप्त
नागपूर २७ : नागपूर जिल्ह्यातील वाडी पोलिसांनी एका बौद्ध भिक्षूच्या घरातून झालेल्या चोरीचा अवघ्या ४८ तासांत छडा लावला आहे. पोलिसांनी या प्रकरणी दोन आरोपींना अटक केली असून, त्यात एका अल्पवयीन मुलाचा समावेश आहे. आरोपींकडून चोरीचा सर्व मालही जप्त करण्यात आला आहे.
ही घटना शुक्रवारी वाडी येथील धम्मकीर्ती नगर, म्हाडा कॉलनी येथे घडली होती. बौद्ध भिक्षू भंते तन्हानकर त्यांच्या घरात प्रार्थना करत असताना, चोरट्यांनी त्यांच्या घरातून सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेली होती. त्यानंतर त्यांनी वाडी पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती.
तक्रार दाखल झाल्यानंतर वाडी पोलिसांनी तात्काळ तपासाची चक्रे फिरवली. त्यांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. फुटेजमध्ये दोन युवक घरातून बाहेर पडताना दिसले. याच आधारावर पोलिसांनी तांत्रिक तपास करून करण पाल नावाच्या आरोपीला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान, त्याने एका अल्पवयीन साथीदारासोबत चोरी केल्याची कबुली दिली.
पोलिसांनी दोन्ही आरोपींकडून चोरीला गेलेला सर्व माल जप्त केला आहे. पुढील तपास वाडी पोलीस करत आहेत.




