जळगाव २७ : जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव येथे भाजपचे माजी नगरसेवक प्रभाकर चौधरी यांच्यावर अज्ञात व्यक्तींनी धारदार कोयत्याने प्राणघातक हल्ला केला आहे. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले असून, त्यांना पुढील उपचारासाठी धुळे येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
नेमकी घटना काय?
ही घटना रात्रीच्या सुमारास वैष्णवी साडी सेंटरजवळ घडली. अज्ञात हल्लेखोरांनी प्रभाकर चौधरी यांना अडवून त्यांच्यावर कोयत्याने वार केले. हल्ल्यानंतर ते गंभीर जखमी झाले आणि मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. रात्री उशिरापर्यंत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
हल्ल्यामागचे कारण अस्पष्ट
हा हल्ला का आणि कोणी केला, याबाबत रात्री उशिरापर्यंत कोणतीही माहिती मिळू शकली नाही. पोलिसांनी हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी तात्काळ पथके रवाना केली आहेत. हा हल्ला राजकीय वैमनस्यातून झाला की वैयक्तिक वादातून, याचा तपास पोलीस करत आहेत. प्रभाकर चौधरी हे भाजपचे निष्ठावान कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. दोन दिवसांपूर्वीच राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते त्यांच्या कार्यालयाचे उद्घाटन झाले होते.
जिल्ह्यातील कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न
या हल्ल्याचा जिल्हा भाजपने तीव्र निषेध व्यक्त केला आहे. ही घटना जळगाव जिल्ह्यातील कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी मानली जात आहे. विशेष म्हणजे, फेब्रुवारी २०२४ मध्ये सुद्धा चाळीसगावमध्ये भाजपचे माजी नगरसेवक महेंद्र उर्फ बाळू मोरे यांच्यावर गोळीबार झाला होता. त्यावेळीही शहरात मोठी खळबळ उडाली होती.




