नागपुरात गणेशोत्सवाचा जल्लोष; ‘नागपूरचा राजा’ गणपतीचे थाटात आगमन

0
59

 

नागपूर २७ : उपराजधानी नागपुरात गणेशोत्सवाचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. ढोल-ताशांचा गजर, गुलालाची उधळण आणि ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात शहर अक्षरशः न्हाऊन निघाले आहे. गणेश मंडळांचे प्रतिनिधी आणि गणेशभक्तांनी मोठ्या संख्येने शहरातील मध्यवर्ती चितारओळी परिसरात गर्दी केली होती.

चितारओळी परिसर हा गणेशोत्सवात नेहमीच खास आकर्षणाचा केंद्रबिंदू असतो. शहरातील ‘नागपूरचा राजा’, ‘अंबाझरीचा मोरया’ आणि ‘धरमपेठचा राजा’ यांसारख्या प्रसिद्ध मंडळांच्या मूर्ती याच ठिकाणी तयार होतात. गणेश चतुर्थीच्या पूर्वसंध्येला मंडळांनी ढोल-ताशांच्या गजरात आणि नृत्याच्या तालावर आपल्या लाडक्या बाप्पाच्या मूर्तींचे स्वागत केले.

मूर्तींची भव्य मिरवणूक काढण्यात आली. लहानग्यांपासून ते वृद्धांपर्यंत सर्व वयोगटातील नागरिक उत्साहाने या मिरवणुकीत सहभागी झाले होते. बाभूळगावहून खास आलेले ढोल-ताशा पथक मिरवणुकीची शान वाढवत होते. ‘गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया’च्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता.

गणेशोत्सव निर्विघ्नपणे पार पडावा यासाठी नागपूर पोलिसांनी विशेष तयारी केली आहे. चितारओळी परिसरात वाहतुकीत बदल करण्यात आले असून, जुनी मंगळवारी चौकात बॅरिकेड्स लावण्यात आले आहेत. गर्दी नियंत्रित करण्यासाठी आणि मिरवणुका सुरळीतपणे पार पाडण्यासाठी ठिकठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. शहरातील या भक्तिमय वातावरणाने आगामी दिवसांत उत्सवाचा उत्साह आणखी वाढणार असल्याचे दिसून येत आहे.