‘महाज्योती’चे प्र. व्यवस्थापकीय संचालक प्रशांत वावगे यांच्याशी प्रा. संजय नाथे यांची विशेष मुलाखत
शासनाच्या यंत्रणेतील बहुतांश संस्थांचा उपयोग ठराविक वर्गापुरताच मर्यादित राहतो. पण काही संस्था अशाही आहेत ज्या नुसत्या योजना राबवण्यात समाधान न मानता त्या योजनांतून समाजजीवनात सकारात्मक बदल घडवतात. समाजाला नवी दिशा, नवी ऊर्जा व नव संजविनी देण्याचे कार्य करतात.
महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था म्हणजेच ‘महाज्योती’ ही संस्था नाही तर विचारांची मशाल आहे, जी ज्ञान, समता आणि सामाजिक प्रगती यांचा मार्ग उजळवते, असं मत ‘महाज्योती’चे प्र. व्यवस्थापकीय संचालक प्रशांत वावगे यांनी व्यक्त केले. नाथे पब्लिकेशनचे संचालक प्रा. संजय नाथे यांनी घेतलेल्या मुलाखतीत प्रशांत वावगे यांनी केवळ आकडेवारी न देता एक सामाजिक परिवर्तनाची प्रक्रिया मांडली. ते म्हणाले ‘महाज्योती’ या नावातच ज्योती आहे. शिक्षणाची, विचारांची आणि प्रगतीची आणि ही ज्योती पेटवली होती क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी, जे भारतातल्या पहिल्या शिक्षणक्रांतीचे शिल्पकार होते. त्या विचारांची ही वर्तमानातील सशक्त प्रतिमा म्हणजे ‘महाज्योती’आहे.
सरकारी चौकटीत पण समाजाच्या हृदयात कार्यरत
‘महाज्योती’ ही संस्था इतर मागासवर्ग व बहुजन कल्याण विभाग अंतर्गत कार्यरत स्वायत्त संस्था आहे. शासनाचा भाग असूनही तिचं कार्य केवळ शासकीय मर्यादांत अडकले नाही. ही संस्था आज इतर मागास वर्ग (ओबीसी), विमुक्त जाती-भटक्या जमाती (व्हीजेएनटी) आणि विशेष मागास प्रवर्गातील (एसबीसी) विद्यार्थ्यांसाठी एक दीपस्तंभ ठरली आहे. साधारणत: महाराष्ट्राच्या लोकसंख्येपैकी एकूण 60 टक्के लोकसंख्या या तीन प्रवर्गात येते. यावरून महाजोती संस्थेच्या व्यापक कार्याचा व राज्य विकासातील भरीव योगदानाचा आपल्याला अंदाज येतो. या वाटचालीमागे इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे मंत्री व ‘महाज्योती’चे अध्यक्ष अतुल सावे साहेब यांचं दूरदृष्टीपूर्ण नेतृत्व आहे, याचा वावगे यांनी कौतुकपूर्वक उल्लेख केला. अतुल सावे साहेबांच्या मार्गदर्शनामुळे ‘महाज्योती’ने आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून पारदर्शक, सुलभ आणि विद्यार्थी केंद्रित सेवा पोहोचवण्याचं कार्य केले, असे प्रशांत वावगे यांनी नमूद केले. ‘महाज्योती’चे प्र. व्यवस्थापकीय संचालक प्रशांत वावगे यांच्याशी झालेला सखोल संवाद म्हणजे फक्त योजनांची माहिती नव्हे, तर एका प्रामाणिक समाजदृष्टीचा आरसा आहे.
वावगे सुरुवातीस सांगतात, ‘महाज्योती’ ही केवळ एक संस्था नाही, ती एक विचार आहे. शिक्षण हे साधन नव्हे ते परिवर्तनाचे शस्त्र आहे. शिक्षणाच्या माध्यमातून बहुजन समाजात समान संधी, आत्मभान आणि सक्षम नेतृत्व उभे करणे, हेच आमचं ध्येय आहे. ते पुढे स्पष्ट करतात की, ‘महाज्योती’ ही महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागाअंतर्गत सन 2019 मध्ये स्थापन झालेली एक स्वायत्त संस्था असून, या विभागाचे मंत्री तथा ‘महाज्योती’चे अध्यक्ष अतुल सावे यांचे नेतृत्व आम्हाला दिशा देणारे ठरले आहे. त्यांच्या मार्गदर्शनामुळे आम्ही योजनांच्या अंमलबजावणीत वेग व पारदर्शकता ठेवू शकलो.
केवळ योजनांचं केंद्र नव्हे, तर आशेचा किरण
शिक्षण ही समतेची गुरुकिल्ली आहे. या विचारातून ‘महाज्योती’ने राज्यभरात विद्यार्थ्यांसाठी मोफत प्रशिक्षण योजना सुरू केल्या. यात
युपीएससी, एमपीएससी, एसएससी, आयबीपीएस, युजीसी नेट/सेट, एमबीए व मिलीटरी परीक्षांसाठी संपूर्ण प्रशिक्षण दिलं जाते. पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि दिल्ली येथील नामांकित प्रशिक्षण संस्थांमधून हे प्रशिक्षण दिलं जातं. विद्यार्थ्यांना फक्त मार्गदर्शनच नव्हे, तर भोजन व निवास यासाठी दरमहा विद्यावेतन, प्रवास भत्ता, टॅबलेट, इंटरनेट सुविधा आणि अभ्याससामग्री यासह सर्व आवश्यक सुविधा मोफत मिळतात.
वावगे सांगतात, ‘विद्यार्थ्यांनी केवळ परीक्षा दिली पाहिजे असे नाही, तर त्यांनी सुजाण भारतीय नागरिक बनून जीवनात नेतृत्व मिळवलं पाहिजे, हा आमचा दृष्टिकोन आहे. आणि हे शक्य झाले आहे ते मा. ना. अतुल सावे साहेब यांच्या शैक्षणिक न्यायासाठी असलेल्या ठाम भूमिकेमुळेच.’ एमएचटी-सीईटी, जेईई, नीट यांसारख्या प्रवेश परीक्षांसाठी ‘महाज्योती’ ऑनलाइन प्रशिक्षण देते. यामध्ये डिजिटल टॅबलेट, इंटरनेट व प्रात्यक्षिक चाचण्यांची सुविधाही दिली जाते. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही आता दर्जेदार तयारीची संधी मिळते आहे.
कौशल्य विकास प्रशिक्षणातून रोजगार निर्मिती
‘महाज्योती’ने माहिती तंत्रज्ञान, वस्त्रोद्योग, आरोग्य सेवा, वाहतूक, वित्त,खेळ, हस्त कला अशा विविध क्षेत्रांत ६० पेक्षा अधिक कौशल्य प्रशिक्षण योजना सुरू केल्या आहेत. वावगे यांनी सांगितले की, “आमचं ध्येय केवळ नोकरी मिळवून देणं नाही, तर स्वयंपूर्ण, आत्मविश्वासू आणि सक्षम नागरिक घडवणं आहे.” या उपक्रमांमुळे युवक-युवतींना केवळ रोजगाराचं दार उघडत नाही, तर त्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची संधी, आर्थिक स्थैर्य आणि आत्मनिर्भरतेची ताकद मिळते. महाज्योती’कडून विविध प्रशिक्षण केंद्रे, अनुभवी प्रशिक्षक, उद्योगाशी जोडलेली प्रॅक्टिकल तालीम आणि मार्गदर्शन शिबिरंही घेतली जातात. यामुळे विद्यार्थ्यांना उद्योगधंद्यांमध्ये तत्काळ रोजगार मिळवता येतो किंवा स्वतःचं यशस्वी उद्यम सुरू करता येते.
शोधकांना आधारवड – पीएचडी फेलोशिप योजना
दरमहा 37 हजार रुपये ते 42 हजार पर्यंत मानधन, आकस्मिक निधी व घरभाडे भत्ता असलेली पीएच.डी. शिष्यवृत्ती योजना आज अनेक संशोधक विद्यार्थ्यांसाठी आशेचा किरण ठरते आहे. वावगे म्हणतात, ‘हा उपक्रम देखील अतुल सावे यांच्याच पुढाकारातून अधिक व्यापक स्वरूपात राबवला जातो आहे. संशोधनाला बळ देणं म्हणजे समाजाच्या मूलभूत प्रश्नांना उत्तर देण्याचा प्रयत्न आहे.
‘महाज्योती’च्या ज्ञानदीपकांची यशस्वी गरुडझेप
‘महाज्योती’ ही केवळ योजना नाही, ती आहे सामाजिक परिवर्तन घडवणारी वैचारिक चळवळ,’ असे स्पष्ट मत वावगे यांनी व्यक्त केले. या संवादात त्यांनी ‘महाज्योती’च्या माध्यमातून लाखो विद्यार्थ्यांच्या जीवनात घडलेल्या परिवर्तनाचा आलेख मांडताना, या यशामागे असलेलं नेतृत्व अधोरेखित केले. त्यांनी यावेळी महाराष्ट्र राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे मंत्री तथा ‘महाज्योती’चे अध्यक्ष अतुल सावे साहेब यांच्या दृष्टीकोनाचाही विशेष उल्लेख केला. सावे साहेबांच्या दूरदृष्टीमुळे ‘महाज्योती’ने पारदर्शकता, डिजिटल साधनांचा वापर आणि ग्रामीण विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणारी प्रभावी व्यवस्था निर्माण केली,’ असे वावगे म्हणाले.
फक्त आकडे नव्हे, तर प्रत्येक विद्यार्थी म्हणजे प्रेरणेचा झरा
वेगवेगळ्या स्पर्धा परिक्षांमधून 2021 ते 2025 दरम्यान 2 हजार 350 विद्यार्थी शासकीय सेवेत निवडले गेले. यातील 55 विद्यार्थ्यांनी युपीएससी परीक्षा यशस्वीरित्या उत्तीर्ण केली. कौशल्य विकास प्रशिक्षणातून 15 हजार 709 विद्यार्थ्यांना रोजगार प्राप्त झाला, तर 13 हजार 953 युवकांनी स्वतःचा व्यवसाय सुरू केला.
डिजिटल सुलभता आणि पारदर्शक कार्यपद्धतीचं उदाहरण
‘महाज्योती’ने संकेतस्थळ आणि मोबाईल अॅप तयार करून अर्ज, निवड प्रक्रिया, वेळापत्रक, तसेच सर्व शासकीय माहिती सहज उपलब्ध करून दिली आहे. ‘शासनाच्या अनेक योजना केवळ कागदांपुरते मर्यादित असतात, पण ‘महाज्योती’ हा त्या साचेबद्धतेला छेद देणारा अपवाद ठरला आहे,’ असे वावगे ठामपणे म्हणतात. ‘तुमची सामाजिक वा आर्थिक पार्श्वभूमी तुमचं भविष्य ठरवत नाही. तुमचं स्वप्न, तुमचा प्रयत्न आणि संधीचा योग्य उपयोग हाच तुमचं आयुष्य घडवतो. ‘महाज्योती’ ही केवळ योजना नाही ती आहे संधी. ती संधी घ्या, स्वत:ला घडवा आणि पुढच्या पिढीलाही घडविण्यास प्रेरीत करा असेही प्रशांत वावगे म्हणाले.’





