कोपर्शीच्या जंगलात पोलिस-नक्षल चकमक, चार नक्षलवाद्यांचा खात्मा; शस्त्रसाठा जप्त

0
48

 

गडचिरोली २८ : गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यात आज पहाटे पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये भीषण चकमक झाली. तब्बल आठ तास चाललेल्या या कारवाईत चार नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. ठार झालेल्यांमध्ये एक पुरुष आणि तीन महिला नक्षलवाद्यांचा समावेश असून, घटनास्थळावरून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा आणि दारूगोळा जप्त करण्यात आला आहे.

गुप्त माहितीच्या आधारे सापळा

गडचिरोली-नारायणपूर सीमेवरील कोपर्शीच्या जंगलात गट्टा दलम, कंपनी क्रमांक १० आणि इतर नक्षलवादी दबा धरून बसले असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीनुसार, अप्पर पोलिस अधीक्षक (अभियान) एम. रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली सी-६० च्या १९ पथकांसह CRPF च्या QAT ची दोन पथके कारवाईसाठी रवाना करण्यात आली.

मुसळधार पावसातही धडाडीची मोहीम

गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे परिस्थिती प्रतिकूल असतानाही पोलिसांनी मोहीम थांबवली नाही. आज सकाळी शोधमोहीमेदरम्यान नक्षलवाद्यांनी अचानक पोलिसांवर गोळीबार सुरू केला. पोलिसांनी तत्काळ प्रतिउत्तर देत जोरदार कारवाई केली.

आठ तासांची भीषण चकमक

सुमारे आठ तास चाललेल्या या चकमकीनंतर परिसराची पाहणी करण्यात आली असता, चार जहाल नक्षलवाद्यांचे मृतदेह पोलिसांना आढळले. एक SLR रायफल, दोन INSAS रायफल आणि मोठ्या प्रमाणात दारूगोळा घटनास्थळावरून जप्त करण्यात आला आहे.

उर्वरित नक्षलवाद्यांच्या शोधासाठी मोहीम सुरू

चकमकीनंतरही कोपर्शीच्या जंगल परिसरात सर्च ऑपरेशन सुरूच आहे. गडचिरोली पोलिसांच्या या यशस्वी मोहिमेमुळे नक्षलविरोधी लढाईत महत्त्वपूर्ण यश मिळाले असून, पोलिस दलाच्या धाडसी कारवाईचे कौतुक होत आहे.