spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

“बिडी कामगारांना न्याय मिळवून देणारे कर्मवीर; त्यांचे आयुष्य समाजसेवेचे आदर्श उदाहरण” – ॲड. सुलेखा कुंभारे

– कर्मवीर ॲड. दादासाहेब कुंभारे यांच्या ४३ व्या स्मृतिदिनानिमित्त ड्रॅगन पॅलेस येथे मानवंदना कार्यक्रम

कामठी :- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक न्यायाच्या चळवळीत कर्मवीर ॲड. दादासाहेब कुंभारे यांचे योगदान ऐतिहासिक आणि प्रेरणादायी ठरले आहे. असंघटीत बिडी कामगारांच्या न्याय व हक्कांसाठी त्यांनी आयुष्यभर झगडून त्यांच्या सन्मानाचे स्वप्न साकार केले. संसद सदस्य झाल्यानंतर त्यांनी “बिडी कामगार कायदा” पारित करून कामगारांना कायदेशीर संरक्षण दिले. त्यांचे जीवन निस्वार्थ, प्रामाणिक आणि लोकहिताच्या कार्याला वाहिलेले होते, असे गौरवोद्गार ॲड. सुलेखा कुंभारे यांनी व्यक्त केले.

कर्मवीर ॲड. दादासाहेब कुंभारे यांच्या ४३ व्या स्मृतिदिनानिमित्त विश्वविख्यात ड्रॅगन पॅलेस, कामठी येथे विविध संस्था व संघटनांच्या संयुक्त विद्यमाने श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात भिक्खू संघाच्या उपस्थितीत तथागत गौतम बुद्ध, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व कर्मवीर दादासाहेब कुंभारे यांच्या प्रतिमेला मेणबत्ती, अगरबत्ती लावून व त्यांना मानवंदना देऊन करण्यात आली. त्यानंतर विशेष बुद्धवंदना व धम्मदेशना घेण्यात आली.

या प्रसंगी ड्रॅगन पॅलेसच्या प्रमुख ॲड. सुलेखा कुंभारे यांनी धम्मदान देऊन अभिवादन केले. तसेच ड्रॅगन पॅलेस परिसरातील कर्मवीर दादासाहेब कुंभारे यांच्या शिल्पाला ओगावा सोसायटी, ड्रॅगन पॅलेस विपश्यना ध्यान केंद्र, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक व संशोधन केंद्र, हरदास शैक्षणिक व सांस्कृतिक संस्था, दादासाहेब कुंभारे बहुउद्देशीय प्रशिक्षण केंद्र, दादासाहेब कुंभारे विद्यालय मेरी, ड्रॅगन इंटरनॅशनल स्कूल, ओगावा इंटरप्रायजेस प्रा. लि. यांच्या प्रतिनिधींनी माल्यार्पण करून आदरांजली वाहिली.

यावेळी दादासाहेब कुंभारे बहुउद्देशीय प्रशिक्षण संस्था, कामठी येथील प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांना एन.सी.व्ही.टी. प्रमाणपत्रे व गणवेश प्रदान करण्यात आले. तसेच न्यू गोल्डन ईयर ग्रुप, नागपूर च्या महिला टीमने संविधान जनजागृती या विषयावर प्रभावी पथनाट्य सादर करून उपस्थितांची प्रशंसा मिळवली.

धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक व संशोधन केंद्रात बाबासाहेबांच्या राजश्री थाटातील शिल्पास पुष्पांजली अर्पण करून मानवंदना देण्यात आली.

या कार्यक्रमात अजय कदम, राहुल बागडे, वंदना भगत, भिमराव फुसे, दीपंकर गणविर, नियाज कुरेशी, अफजल अंसारी, दीपक सिरीया, सुभाष सोमकुवर, अंकुश बांबोर्डे, रेखा भावे, राजेश गजभिये, सागर भावे, चंद्रशेखर लांजेवार, राजेश शंभरकर, सचिन नेवारे, वंदना आळे, छाया फुलझेले, विमल लोणारे आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

या श्रद्धांजली सोहळ्याने पुन्हा एकदा कर्मवीर ॲड. दादासाहेब कुंभारे यांच्या समाजसेवा, संघर्ष आणि धम्मप्रेरित कार्याचा गौरवशाली इतिहास उजळवला. त्यांचे विचार आणि आदर्श भावी पिढ्यांसाठी प्रेरणादायी दीपस्तंभ ठरतील, अशी भावना सर्व उपस्थितांनी व्यक्त केली.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.