spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

गड्ढ्यांचा महामार्ग! राष्ट्रीय महामार्ग 63 दुरवस्थेत, तातडीच्या दुरुस्तीची गरज  

सिरोंच्यातील सोमनपल्ली-पातागुडम मार्गावरील दुरुस्तीची तातडीची गरज; बस सेवा ठप्प, प्रवासी त्रस्त

सतीश कुमार पडमाटिंटी सिरोंचा २५ : सिरोंचा तालुक्यातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 63 पुन्हा एकदा चर्चेत आला असून यावेळी कारण आहे त्याची खराब झालेली गुणवत्ता. बांधकामाच्या काळातच चर्चेत असलेला हा मार्ग आता मोठमोठ्या गड्ढ्यांमुळे प्रवाशांसाठी धोकादायक ठरत आहे. विशेषतः सोमनपल्ली ते पातागुडम दरम्यानचा रस्ता अतिशय दयनीय स्थितीत असून गड्ढ्यांमुळे वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली आहे.

या मार्गावरून धावणाऱ्या अंतरराज्यीय बससेवांपैकी आसिफाबाद बससेवा मागील दोन दिवसांपासून बंद करण्यात आली आहे, तर भोपालपटनम-हैदराबाद बससेवाही बंद होण्याच्या मार्गावर आहे. प्रवाशांना आता टॅक्सीवर अवलंबून प्रवास करावा लागत असून त्यामुळे सुरक्षेचा धोका आणि आर्थिक नुकसान या दोन्ही समस्या निर्माण झाल्या आहेत.

अलीकडेच अंतरराज्यीय पुलांच्या बांधकामामुळे या महामार्गावरून प्रवासी वाहनांसह जड मालवाहू वाहने मोठ्या प्रमाणात धावू लागली आहेत. वाढत्या वाहनदबावामुळे सिरोंचा तालुक्यातील महामार्गाचा मोठा भाग उखडला असून रस्ता पूर्णपणे जीर्णावस्थेत पोहोचला आहे.

पातागुडम ते आसरअल्ली या फक्त २५ किलोमीटर अंतरासाठी तब्बल ४० मिनिटांहून अधिक वेळ लागत आहे. यावरून या महामार्गाच्या दुरुस्तीची तातडीची गरज किती गंभीर आहे, हे स्पष्ट होते.

महामार्ग क्रमांक 63 हा सिरोंचा क्षेत्रातील नागरिकांसाठी सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा आहे. छत्तीसगडच्या लोकांशी येथील रोटी-बेटीचे जुने नाते असल्याने या मार्गावरून मोठ्या प्रमाणात प्रवास आणि व्यापार सुरू असतो. मात्र रस्त्याच्या दुरवस्थेमुळे स्थानिक व्यापाऱ्यांनाही मोठं नुकसान सहन करावं लागत आहे.

अलीकडेच वडधमजवळील पुलाच्या अ‍ॅप्रोच रस्त्याचे नुकसान झाल्यामुळे आठवडाभर बससेवा ठप्प झाली होती. आता गड्ढ्यांमुळे पुन्हा बससेवा बंद होण्याची समस्या निर्माण झाली आहे.

स्थानिक नागरिकांनी मागणी केली आहे की, संबंधित विभागाने तातडीने दखल घेऊन महामार्ग क्रमांक 63 ची दुरुस्ती त्वरीत हाती घ्यावी. दुरुस्ती लवकर सुरू न झाल्यास, बंद झालेल्या बससेवा पुन्हा सुरू होण्यास विलंब होईल आणि प्रवाशांना होणारा अडथळा, आर्थिक तोटा आणि वाहतुकीची कोंडी आणखी वाढू शकते.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.