शेकडो सायकलपटूंचा सहभाग; विजेत्यांचा पोलिस विभागाकडून सन्मान
गोंदिया : “फिटनेस की डोज, आधा घंटा रोज” या टॅगलाईनखाली फिट इंडिया सायकलिंग ड्राइव्ह उपक्रमांतर्गत गोंदिया जिल्हा पोलिस विभागाच्या वतीने पहिल्यांदाच भव्य सायकलथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत गोंदिया शहर व जिल्ह्यातील शेकडो सायकलपटूंनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून सायकलिंगचा आनंद लुटला.
या प्रसंगी जिल्हा पोलिस अधीक्षक गौरख भामरे, पोलिस उपअधीक्षक अभय डोगरे यांच्यासह जिल्ह्यातील उपविभागीय पोलिस अधिकारी आणि पोलिस निरीक्षकांनीही सायकल चालवून “हेल्थ इज वेल्थ” तसेच पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला.
विशेष म्हणजे, गोंदिया जिल्यातील सायकल संडे ग्रुपनेही या उपक्रमात सक्रिय सहभाग घेतला. यात सायकलपटू परमजीत सिंग यांनी पहिले स्थान पटकावले, उदयभान निर्वाण यांनी दुसरा क्रमांक मिळवला तर नवीन दहिकर यांनी तिसरा क्रमांक पटकावला. विजेत्यांना पोलिस अधीक्षक गौरख भामरे यांच्या हस्ते प्रमाणपत्रे देऊन सन्मानित करण्यात आले.
या स्पर्धेद्वारे नागरिकांना फिटनेस, आरोग्य जागरूकता आणि पर्यावरण संवर्धन याबद्दल संदेश देण्यात आला. जिल्हा पोलिसांच्या या अभिनव उपक्रमाचे गोंदिया शहरातील नागरिकांनी आणि सहभागी सायकलपटूंनी विशेष कौतुक केले.




