पांढरकवडा :- दिनांक १ फेब्रुवारी २०२६ रोजी केळापुर येथे सकल हिंदू समिती, केळापुर मंडळ यांच्या वतीने भव्य व विशाल हिंदू संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या संमेलनाला परिसरातील नागरिक, विविध सामाजिक संस्था, युवक-युवती तसेच धर्मप्रेमी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. संमेलनाचा परिसर धार्मिक वातावरणाने आणि उत्साहाने भारलेला दिसून येत होता.
या संमेलनाचे प्रमुख आकर्षण म्हणून ह.भ.प. वेदाचार्य पेंदोर महाराज यांची प्रमुख उपस्थिती लाभली. त्यांनी आपल्या आशीर्वचनपर भाषणातून समाजात सदाचार, संस्कार व एकात्मता यांचे महत्त्व अधोरेखित केले. धर्म, संस्कृती आणि सामाजिक बांधिलकी यांचा समतोल राखत समाज प्रबोधनाचे कार्य करण्याचे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले.
कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते म्हणून डॉ. नितीन खर्चे (अध्यक्ष, दि यवतमाळ अर्बन को-ऑप बँक, यवतमाळ) यांनी प्रभावी व विचारप्रवर्तक मार्गदर्शन केले. आपल्या उद्बोधनात त्यांनी हिंदू समाज हा पर्यावरणाचा नैसर्गिक संरक्षक असल्याचे सांगितले. त्यामुळे समाजाकडून कोणत्याही प्रकारचे पर्यावरण व जलप्रदूषण होऊ नये, यासाठी प्रत्येकाने जबाबदारीने वागणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच नागरी कर्तव्यांचे पालन, स्वदेशी वस्तूंचा वापर, कुटुंबातील संस्कार व आदर्श हिंदू घराचे स्वरूप याबाबतही त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. या संमेलनाला प्रमुख पाहुणे म्हणून केळापुर येथील सधन कास्तकार देवराव भूपतवार उपस्थित होते. तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा संघचालक गोविंद हातगावकर यांनीही उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली. विविध मान्यवरांच्या उपस्थितीमुळे संमेलन अधिक प्रेरणादायी ठरले. कार्यक्रमाचे आयोजन सुयोग्य नियोजनासह करण्यात आले होते. उपस्थितांनी वक्त्यांच्या मार्गदर्शनाचे स्वागत करत सामाजिक ऐक्य, पर्यावरण संवर्धन व संस्कारयुक्त जीवनशैलीचा संदेश पुढे नेण्याचा संकल्प व्यक्त केला. संमेलनाच्या यशस्वी आयोजनाबद्दल सकल हिंदू समिती, केळापुर मंडळ यांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक करण्यात आले.




