spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

पांढरकवाडा शहरातील रस्त्यांवर मधोमध मोकाट जनावरांचा हैदोस; नगरपरिषद प्रशासन झोपेत

पांढरकवाडा :- शहरातील प्रमुख रस्त्यांवर मोकाट जनावरांचा वावर दिवसेंदिवस वाढत असून, रस्त्याच्या मधोमधच जनावरे ठाण मांडून बसत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे वाहनचालकांना मार्ग काढताना कसरत करावी लागत असून, किरकोळ अपघातांसह गंभीर दुर्घटनेची शक्यता निर्माण झाली आहे. मोकाट जनावरांचा प्रश्न नागरिकांसाठी नवा नसतानाही नगरपरिषद प्रशासनाकडून ठोस उपाययोजना होत नसल्याने प्रशासन नेमके झोपेत आहे का?, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

शहरातील वर्दळीच्या रस्त्यांवर गायी व इतर मोकाट जनावरे अचानक रस्त्यावर येत असल्याने वाहतुकीचा वेग मंदावतो. अनेकदा जनावरे रस्त्याच्या अगदी मध्यभागी बसलेली असतात. त्यांना चुकविताना दुचाकीस्वार तसेच चारचाकी वाहनचालकांना अचानक दिशा बदलावी लागते. यामुळे समोरून येणाऱ्या वाहनांशी धडक होण्याचा धोका वाढला आहे.

रस्ते जनावरांसाठी की वाहनांसाठी?

शहरातील रस्त्यांवर मोकाट जनावरांचा वाढता वावर पाहता, रस्ते नेमके नागरिकांच्या वाहतुकीसाठी आहेत की मोकाट जनावरांसाठी? असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत. विशेषतः रात्रीच्या वेळी रस्त्यावर बसलेली जनावरे वाहनचालकांच्या लक्षात उशिरा येत असल्याने धोका अधिक वाढतो.

मालकांवर कारवाईची गरज

जनावरे रस्त्यावर मोकाट सोडणाऱ्या मालकांवर दंडात्मक कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. तसेच नगरपरिषदेने मोकाट जनावरांना पकडण्यासाठी नियमित मोहीम राबवून त्यांची योग्य ठिकाणी व्यवस्था करावी, अशी अपेक्षा आहे.

शहरातील नागरिकांच्या सुरक्षिततेशी संबंधित हा प्रश्न असल्याने प्रशासनाने तातडीने मोकाट जनावरांचा बंदोबस्त करून रस्ते मोकळे करावेत, अशी मागणी होत आहे. अन्यथा एखादी मोठी दुर्घटना घडल्यानंतरच प्रशासन जागे होणार का, असा सवालही नागरिकांकडून केला जात आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.