spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

गॅस एजन्सी मिळवून देण्याच्या नावाखाली भंडारा जिल्ह्यातील एकाची १.६९ लाखांची फसवणूक; सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

हंसराज, प्रतिनिधी भंडारा :-  हिंदुस्थान पेट्रोलियमची (HP) गॅस एजन्सी मिळवून देण्याचे आमिष दाखवून मोहाडी तालुक्यातील सातोना येथील एका व्यक्तीची १ लाख ६९ हजार ६० रुपयांनी फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी भंडारा सायबर पोलीस ठाण्यात दोन भामट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी राकेश यादोशाव चौरागडे (४२, रा. नेताजी वार्ड, सातोना, ता. मोहाडी) यांना २४ नोव्हेंबर २०२५ ते ७ जानेवारी २०२६ या कालावधीत दोन वेगवेगळ्या मोबाईल क्रमांकावरून फोन आले. आरोपी क्र. १ अशोक कामट (मोबाईल क्र. ९३१८४८८८०९) याने आपण हिंदुस्थान पेट्रोलियम गॅस एजन्सीचे मॅनेजर बोलत असल्याचे सांगितले. त्यानंतर आरोपी क्र. २ रमेश कांबळे (मोबाईल क्र. ६३९८८३८९०७) याने आपण अलॉटमेंट मॅनेजर असल्याचे सांगून फिर्यादीची गॅस एजन्सीच्या डीलरशिपसाठी निवड झाली आहे, असा विश्वास दिला.

फिर्यादीचा विश्वास संपादन करण्यासाठी आरोपींनी गॅस एजन्सीशी संबंधित बनावट कागदपत्रे व्हॉट्सॲप आणि ई-मेलवर पाठवली. ही कागदपत्रे खरी असल्याचे भासवून आरोपींनी फिर्यादीला विविध प्रक्रिया शुल्काच्या नावाखाली पैसे भरण्यास प्रवृत्त केले. फिर्यादीने आरोपींनी दिलेल्या बँक खात्यात फोनपे (PhonePe) द्वारे टप्प्याटप्प्याने एकूण १,६९,०६० रुपये जमा केले. मात्र, पैसे भरूनही एजन्सीबाबत कोणतीही हालचाल न झाल्याने आपली फसवणूक झाल्याचे चौरागडे यांच्या लक्षात आले.

या प्रकरणी राकेश चौरागडे यांनी भंडारा सायबर पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी अशोक कामट आणि रमेश कांबळे यांच्या विरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३१८ (४) तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियम (IT Act) कलम ६६ (क), ६६ (ड) अन्वये गुन्हा नोंद केला आहे. प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक तिवारी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

Popular Articles