spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

मित्राकडूनच विश्वासघात; खासगी गोष्टी उघड करण्याची धमकी देत ४.२० लाखांची खंडणी

– बदनामीची भीती दाखवून उकळले पैसे

हंसराज, प्रतिनिधी भंडारा पवनी :- एकमेकांच्या खासगी गोष्टी माहीत असल्याचा फायदा घेत, स्वतःच्याच मित्राला ब्लॅकमेल करून ४ लाख २० हजार रुपयांची खंडणी उकळल्याचा खळबळजनक प्रकार पवनी येथे उघडकीस आला आहे. या प्रकरणी पवनी पोलिसांनी दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

फिर्यादी अंशुल दौलतराव गभणे (३९, रा. ताडेश्वर वार्ड, पवनी) आणि आरोपी धनंजय नरेंद्र दुधपचारे (४२) व मिनल लक्ष्मण नान्हे/दुधपचारे (३८, दोन्ही रा. लाखनी) हे एकमेकांचे परिचित व मित्र आहेत. घनिष्ठ मैत्री असल्याने त्यांना एकमेकांच्या वैयक्तिक आणि खासगी गोष्टींची माहिती होती. याच गोष्टींचा आधार घेऊन आरोपींनी फिर्यादीला धमकावण्यास सुरुवात केली.

आरोपींनी फिर्यादीच्या खासगी गोष्टी त्यांच्या पत्नीला सांगण्याची आणि विविध प्रसार माध्यमांद्वारे प्रसारित करून सामाजिक बदनामी करण्याची भीती दाखविली. या त्रासाला कंटाळून आणि आपली बदनामी होऊ नये या भीतीने फिर्यादीने आरोपींना आतापर्यंत ४ लाख २० हजार रुपये दिले. मात्र, एवढी मोठी रक्कम मिळाल्यानंतरही आरोपींची हाव मिटली नाही. त्यांनी फिर्यादीकडे पुन्हा अतिरिक्त पैशांची मागणी केली.

जेव्हा फिर्यादीने आणखी पैसे देण्यास नकार दिला, तेव्हा आरोपींनी पुन्हा खासगी माहिती सार्वजनिक करण्याची धमकी दिली. अखेर, सततच्या जाचाला कंटाळून अंशुल गभणे यांनी पवनी पोलीस स्टेशन गाठून तक्रार दिली.

फिर्यादीच्या लेखी रिपोर्टवरून पवनी पोलिसांनी आरोपी धनंजय दुधपचारे आणि मिनल नान्हे यांच्या विरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०८(१) (खंडणी), ३५१ (गुन्हेगारी धमकी) आणि ३(५) अन्वये गुन्हा नोंद केला आहे. प्रकरणाचा पुढील तपास श्रेणी पोलीस उपनिरीक्षक येवले करीत आहेत.

Popular Articles