spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेच्या सहअध्यक्षपदी आ. रणधीर सावरकर यांची नियुक्ती

मुंबई :- नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या टप्पा-1 च्या यशस्वीतेनंतर शासनाने सदर प्रकल्पाचा टप्पा -2 राबविण्याचा निर्णय घेतला. शेती आणि शेतकऱ्यांसोबत असलेली नाळ, कृषि क्षेत्रातील धोरण, योजना आणि जमिनीवरील वास्तव याची जाण असलेल्या आमदार रणधीर सावरकर यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेच्या सह अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. राज्याच्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या टप्पा-2 साठी दि. 14 ऑक्टोबर 2024 च्या शासन निर्णयानुसार गठित करण्यात आलेल्या समितीच्या रचनेत सुधारणा करून सह अध्यक्ष पद निर्माण करून आमदार रणधीर सावरकर यांना सहअध्यक्ष नेमण्यात येऊन नव्याने समिती गठीत करण्यात आलेली आहे. या संबंधाने महाराष्ट्र शासनाच्या कृषी, पशुसंवर्धन, दुग्धविकास व्यवसाय व मत्स्यव्यवसाय विभाग यांनी दिनांक 13 डिसेंबर 2025 रोजी शासन निर्णय क्र. कृवपदुम 19046/44/2025/MAG- 8A (E-1262285) अन्वये आदेश निर्गमित केला आहे, सुधारीत सुकाणू समितीच्या अध्यक्षपदी राज्याचे मुख्य सचिव असून सहअध्यक्ष म्हणून आमदार रणधीर सावरकर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे, या समितीमध्ये नियोजन विभाग, वित्त विभाग, सहकार व पणन, कृषी विभाग, पदुम, जलसंधारण विभाग, या विभिगांचे सचिव/प्रधान सचिव/अपर मुख्य सचिव तसेच आयुक्त कृषी विभाग, राज्यातील कृषी विद्यापीठांचे कुलगुरू, प्रकल्प संचालक नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अशी समितीची एकूण रचना आहे.

प्रकल्प अहवाल, प्रकल्प अंमलबजावणी आराखडा व विविध कार्यप्रणाली पुस्तिका (Manuals) इ. तयार करण्यासाठी मार्गदर्शन करणे, त्यास मान्यता देणे व मंत्रिमंडळाची मान्यता घेणे. प्रकल्प अंमलबजावणीसाठी धोरणात्मक बाबीसंबंधी मार्गदर्शन करणे. वार्षिक कृति आराखड्यास मान्यता देणे व आढावा घेणे. प्रकल्पासंबंधित वेगवेगळ्या विभागामध्ये समन्वय साधण्यासंबंधी निर्देश देणे. प्रकल्पाच्या मंजूर आराखड्यामध्ये परिस्थितीनुरुप आवश्यक बदलास मान्यता देणे. तसेच, जागतिक बँकेच्या सुचनांप्रमाणे विविध पुस्तिकांतील बदलास मान्यता देणे. प्रकल्पाच्या मंजूर आराखड्यातील घटकांच्या / बाबींच्या अंमलबजावणीबाबत तांत्रिक सल्ला देणे. अशी समीतीच्या कामाची व्याप्ती आहे.

बदलत्या हवामानाचा शेतीवर होत असलेल्या प्रतिकूल परिणामांची तीव्रता कमी करून शेतकऱ्यांना हवामान बदलांमुळे उद्भवलेल्या परिस्थितीशी जुळवून घेण्यास सक्षम करणे आणि शेती व्यवसाय किफायतशीर करण्यास सहाय्य करणे याकरिता देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती शासनाने सन 2018 मधे राज्यात नानाजी देशमुख कृषी संजीवनी हा प्रकल्प, महाराष्ट्र शासनाने जागतिक बँकेचे अर्थसहाय्याने एक धोरणात्मक असा हा कृषिक्रांतीकारी प्रकल्प राबविला होता, या प्रकल्पाच्या तांत्रिक सल्लागार समितीवर आमदार रणधीर सावरकर कार्यरत होते, आमदार सावरकर हे प्रगतिशील शेतकरी तसेच अभियंता आहेत कृषी क्षेत्रासंबंधी त्यांचा दांडगा अनुभव आहे, डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेवर सलग तिसऱ्यांदा ते सदस्यपदी काम करीत आहेत, कृषी क्षेत्रामधील योजना, कृषी क्षेत्राचे धोरण, शेतकरी आणि कृषी व पणन विषयक समस्या इत्यादी याबाबत राज्याचे अधिवेशनामध्ये वेळोवेळी आ. सावरकरांनी शासनाची भूमिका व शासन शेतकऱ्यांप्रती निभावत असलेले दायित्व यावर सतत अत्यंत मुद्देसुदपणे बाजू मांडली, परंतु सोबतच शासकीय योजना यशस्वीपणे राबविण्यात शासनातील नोकरशाही कुठे आणि कशी अपुरी पडते याबाबत सुद्धा त्यांनी सभागृहातील अनेक भाषणांमधे आपले परखड विचार व्यक्त केले आहेत, शासकीय अधिकारी व कर्मचारी हे समाजाचेच घटक असल्याने सामाजिक बांधिलकी व शासनाप्रति असलेले कर्तव्य लक्षात घेऊन त्यांनी काम करावे अशी अपेक्षा व्यक्त केली आहे, आमदार रणधीर सावरकर हे अत्यंत स्पष्टपणे विषयाची मांडणी करणारे कृषी क्षेत्रातले जाणकार म्हणून सर्वज्ञात आहेत.

हवामान अनुकूल शेती म्हणजे बदलत्या हवामानाशी जुळवून घेत, कमी खर्चात, नैसर्गिक संसाधनांचा योग्य वापर करून, उत्पन्न वाढवणारी शेती पद्धती आहे, ज्यात नैसर्गिक शेती (Natural Farming), सेंद्रिय शेती (Organic Farming), अचूक शेती (Precision Farming), पीक विविधता (Crop Diversification) आणि पाणी व्यवस्थापन (Water Management) यांचा समावेश होतो, ज्यामुळे हवामान बदलाचा शेतीवर होणारा नकारात्मक परिणाम टाळता येतो व शाश्वत शेतीसह, कृषी यांत्रिकीकरण, शेतकरी वैयक्तिक पातळीवर लाभाच्या योजना, भांडवल निर्मिती, AI आधारित कृषी सल्ला अशा अनेक बाबिंवर या योजनेत शेती आणि शेतकऱ्यांना समृद्धशाली करण्यासाठी काम करण्यात येणार आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.