लोहमार्ग पोलिसांनी फलाट एकवरून घेतले ताब्यात
पोलिस पथकासह गुप्तचर यंत्रणाही लागली कामी
नागपूर, ११ :दिल्ली कवा मथुरेकडे जाणाऱ्या गाडीत बसण्याची त्यांची तयारी होती. फलाट क्रमांक एकवर ते गाडीच्या प्रतीक्षेत होते. मात्र, गाडी येण्यापूर्वी लोहमार्ग पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेतले. अल्पवयीन मुलीला चाईल्ड वेल्फेअर कमिटीच्या स्वाधीन करण्यात आले. माहिती मिळताच तिचे पालक सोमवारच्या रात्रीच लोहमार्ग ठाण्यात पोहोचले.
अल्पवयीन मुलगी भोपाळची असून, 14 वर्षांची आहे, तर अल्पवयीन मुलगा 17 वर्षांचा असून, तो सांचीचा आहे. शनिवारी रात्री अल्पवयीन मुलीने आईच्या मोबाईलमध्ये असलेले दोन्ही सीमकार्ड काढून घरी ठेवले आणि मोबाईल घेऊन निघून गेली. पहाटे 4.30 वाजताच्या सुमारास आईची झोप उघडली असता मुलगी गायब होती. शक्य तेथे तिचा शोध घेण्यात आला. मात्र ती कुठेच सापडली नाही. पालकांच्या तक्रारीवरून भोपाळ पोलिसांनी बेपत्ता झाल्याची तक्रार नोंद करून मुलीच्या शोधासाठी सर्व प्रयत्न केले.
पोलिस तपासात अल्पवयीन मुलीचा मित्रसुद्धा घरून बेपत्ता होता. त्याच्या मोबाईलचे लोकेशन काढले असता नागपूर रेल्वेस्थानक परिसरात असल्याची माहिती मिळाली. या घटनेची माहिती लोहमार्ग पोलिस निरीक्षक गौरव गावंडे यांना देण्यात आली. त्यांच्या मोबाईल फोनवर अल्पयवयीन मुलगी आणि मुलाचे छायाचित्र पाठविण्यात आले. लोहमार्ग पोलिस शोध घेत असतानाच शहर पोलिस, एटीएस आणि गुप्तचर यंत्रणासुद्धा या प्रकरणावर लक्ष ठेवून होती. गावंडे यांनी सर्व पोलिस पथकांकडे दोघांचीही छायाचित्रे दिली. पोलिस पथकांने रेल्वे स्थानक परिसर पजून काढला. सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातूनही लक्ष ठेवून होते. दुपारी 3 वाजताच्या सुमारास दोन्ही अल्पवयीन फलाट क्रमांक एकवर गाडीच्या प्रतीक्षेत होते. पथकाने व्हॉट्स ॲपवरील छायाचित्रांवरून त्यांना ताब्यात घेतले. ठाण्यात आणून त्यांच्या पालकांना माहिती दिली. मुलीचे पालक सोमवारच्या रात्री, तर मुलाचे पालक मंगळवारी नागपूर लोहमार्ग ठाण्यात पोहोचले.




