सावनेर ८ : शहरातील प्रसिद्ध व्यापारी कृष्णा मानकर यांचा मुलगा उमेश कृष्णा मानकर (३२) याचा राजस्थानमधील जयपूर जिल्ह्यात झालेल्या एका भीषण रस्ते अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे मानकर कुटुंब आणि संपूर्ण सावनेर शहरावर शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, उमेश आपल्या एमएच ४० एसी २७१६ क्रमांकाच्या कारने रात्री १० वाजण्याच्या सुमारास राजस्थानमधील खाटूश्याम आणि पुष्कर येथील दर्शनाहून जयपूरला परत येत होते. जयपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ वर, समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या आरजे ४७ जीए ४६५९ क्रमांकाच्या पिकअप व्हॅनने त्यांच्या कारला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, कारचा चक्काचूर झाला आणि उमेशचा जागीच मृत्यू झाला. सुदैवाने, कारमधील त्यांच्या महिला सहकारी आणि मुलाला किरकोळ दुखापत झाली.
या घटनेची माहिती मिळताच मानकर कुटुंबाने हितज्योती फाऊंडेशनचे संस्थापक हितेश बनसोड यांच्याशी संपर्क साधला. योगायोगाने, बनसोड घटनास्थळापासून फार दूर नव्हते. त्यांनी तातडीने मौखमपुरा पोलीस ठाण्यातील घटनास्थळ गाठले आणि पोलिसांना घटनेची माहिती दिली. त्यांच्या तक्रारीवरून पिकअप व्हॅन चालकाविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम २८१, १२५ (अ), १०६ (१) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मौखमपुरा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस स्टेशन प्रभारी मक्कन लाल या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.




