– अल्प शुल्कात हजारो रुग्णांना नवजीवन; परिसरातील जनतेकडून सेवाभावी वैद्याचा गौरव
पंकज परशुरामकर,इनसाइडर न्यूज टुडे प्रतिनिधी
नवेगाव बांध :- नवेगाव बांध परिसरातील ज्येष्ठ, सेवाभावी आणि माणुसकीची जपणूक करणारे वैद्य आदरणीय डॉ. अ. का. कापगते साहेब यांचा ७२ वा वाढदिवस सोमवार, दि. २० जुलै रोजी उत्साहपूर्ण वातावरणात आणि कृतज्ञतेच्या भावनेत साजरा करण्यात आला. त्यांच्या वाढदिवसानिमित्त नागरिक, रुग्ण, सामाजिक कार्यकर्ते आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शुभेच्छांचा वर्षाव करत त्यांच्या निरपेक्ष रुग्णसेवेचा गौरव केला.
आजच्या व्यापारीकरणाच्या युगात वैद्यकीय सेवा अनेक ठिकाणी केवळ व्यवसाय बनत चालली असताना डॉ. कापगते साहेबांनी मात्र “रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा” या तत्त्वाला आयुष्यभर जपले आहे. अनेक दशकांपासून त्यांनी हजारो गरीब, गरजू आणि सर्वसामान्य रुग्णांची अत्यल्प शुल्कात सेवा करून समाजासमोर माणुसकीचा आदर्श निर्माण केला आहे.
त्यांच्या उपचारांमुळे रुग्णांना केवळ औषधोपचार मिळत नाहीत, तर मानसिक आधार, आत्मविश्वास आणि जगण्याची नवी उमेद मिळते. रुग्णांच्या वेदना समजून घेण्याची त्यांची संवेदनशीलता, उपचारातील प्रामाणिकपणा आणि प्रत्येकाशी प्रेमाने वागण्याची त्यांची शैली ही त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची सर्वात मोठी ओळख बनली आहे. त्यामुळेच डॉ. कापगते साहेब हे परिसरातील जनतेसाठी केवळ डॉक्टर नसून एक विश्वासू मार्गदर्शक, हितचिंतक आणि माणुसकीचा खरा आधारवड म्हणून ओळखले जातात.
वयाच्या ७२ व्या वर्षातही त्यांची कार्यतत्परता, साधेपणा आणि समाजाप्रती असलेली बांधिलकी तरुण पिढीसाठी प्रेरणादायी ठरत आहे. ज्ञान, अनुभव, कर्तृत्व आणि नम्रता यांचा सुंदर संगम असलेले त्यांचे व्यक्तिमत्त्व आजही सर्वांच्या मनात आदर निर्माण करते.त्यांच्या वाढदिवसानिमित्त परिसरातील नागरिकांनी दीर्घायुष्य, उत्तम आरोग्य आणि अखंड रुग्णसेवेची शक्ती लाभो अशा मंगलमय शुभेच्छा दिल्या.यावेळी आरुषी पब्लिक स्कूल व अमित ज्युनियर कॉलेजचे संस्थापक व सचिव एकनाथ बोरकर, वैशाली बोरकर, तसेच शाळेचे सर्व शिक्षक व कर्मचारी यांनी डॉ. कापगते साहेबांना शुभेच्छा देत त्यांचा वाढदिवस साजरा केला.
“डॉ. कापगते यांच्या हे वयाने, ज्ञानाने, अनुभवाने आणि कर्तृत्वाने मोठे असले तरी त्यांचे व्यक्तिमत्त्व तितकेच नम्र, वत्सल आणि प्रेमळ आहे. त्यांच्या निरपेक्ष रुग्णसेवेचा आदर्श समाजासाठी सदैव प्रेरणादायी राहील.”
— पंकज सुभाष परशुरामकर,परशुरामकर सेतु केद्र व आधार केद्र नवेगाव बांध



