गुमथळा गावाच्या सर्वांगीण विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी; पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची ग्वाही

0
17

कामठी :- गुमथळा गावाचा सर्वांगीण आणि शाश्वत विकास करण्यासाठी केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांमधून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्यात येईल, अशी ग्वाही राज्याचे महसूल मंत्री तथा नागपूर-अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.

गुमथळा ग्रामपंचायत अंतर्गत जिल्हा परिषद नागपूरच्या सेस फंडातून २५ लाख रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या व्यायामशाळा व सार्वजनिक वाचनालयाच्या इमारतीचे लोकार्पण पालकमंत्री बावनकुळे यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

मार्गदर्शन करताना बावनकुळे म्हणाले, “गुमथळा गावाच्या सर्वांगीण विकासासाठी रस्ते, पाणीपुरवठा, शिक्षण, क्रीडा, वाचनालय, सामाजिक सुविधा आदी विकासकामांचे प्रस्ताव ग्रामपंचायतीने सादर करावेत. हे प्रस्ताव शासनस्तरावर प्राधान्याने मंजूर करून केंद्र व राज्य सरकारकडून आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत.”

यावेळी ज्योती बावनकुळे, संकेत बावनकुळे, माजी जिल्हा परिषद विरोधी पक्षनेते अनिल निधान, माजी सभापती उमेश रडके, कामठी तालुका भाजप आघाडी अध्यक्ष सचिन घोडमारे, महिला आघाडी अध्यक्षा नेहा राऊत, उपविभागीय अधिकारी संजय पवार, तहसीलदार गणेश जगदाळे, गटविकास अधिकारी पियुष डोंगरे, सरपंच प्रणाली योगेश डाफ, उपसरपंच सीमा चवरे, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामविकास अधिकारी सचिन खोडे तसेच गावातील अनेक मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे संचालन योगेश डाफ यांनी केले, तर आभारप्रदर्शन ग्रामविकास अधिकारी सचिन खोडे यांनी केले. कार्यक्रमाला गावकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. नव्याने उभारण्यात आलेली व्यायामशाळा व सार्वजनिक वाचनालयामुळे युवकांना क्रीडा व अभ्यासासाठी आधुनिक सुविधा उपलब्ध होणार असून, गावाच्या विकासाला नवी दिशा मिळणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.