कामठी :- यंदाच्या खरीप हंगामात पावसाच्या लहरीपणामुळे कामठी तालुक्यातील शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे. या खरीप हंगामात धान पिकाबाबत आशावाद निर्माण झाला होता. मात्र जुलैच्या सुरुवातीला पावसाने अचानक दडी मारल्याने धान रोपवाटिकेतील रोपे सुकण्याच्या मार्गावर आली होती. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत मोठी भर पडली.
पण आज कामठी तालुक्यात झालेल्या पावसामुळे धान लागवडीच्या कामांना पुन्हा वेग आला असून शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. अनेक शेतांमध्ये रोपांची लागवड सुरू झाली आहे. मात्र पावसाचे सातत्य नसल्याने शेतकऱ्यांची चिंता अद्याप कायम आहे.
हवामानातील सातत्याने होणारे बदल, पावसाचा खंड आणि अचानक कोसळणाऱ्या सरी यामुळे शेतीचे नियोजन विस्कळीत होत आहे. काही भागांत लागवड उशिरा होत असून काही शेतकऱ्यांना पुन्हा रोपांची तयारी करावी लागत आहे. त्यामुळे उत्पादन खर्च वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
शेतकरी आता नियमित आणि समाधानकारक पावसाच्या प्रतीक्षेत असून, पुढील काही दिवसांत पावसाने साथ दिल्यास धान पिकाला मोठा दिलासा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. मात्र निसर्गाच्या लहरीपणामुळे खरीप हंगामाबाबतची धाकधूक अद्याप कायम असून शेतकरी आभाळाकडे आशेने डोळे लावून बसले आहेत.



