खापा,वार्ताहर :- नुकताच दहावी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला त्यात सावनेर तालुक्यातील बावनगाव फाट्याजवळील नैसर्गिक वातावरणात असलेल्या अभ्युदय ग्लोबल विलेज स्कूलने (एजीव्हीएस) यावर्षीही दहावीच्या परीक्षेत सलग पाचव्यांदा १०० टक्के निकालाची परंपरा कायम राखत उल्लेखनीय यश संपादन केले. विशेष म्हणजे, २०२५-२६ या शैक्षणिक वर्षात २२ विद्यार्थ्यांच्या बॅचमधील एकाही विद्यार्थ्याने कोणत्याही प्रकारची खासगी ट्युशन न लावता हे यश मिळविले असून, शाळेच्या शिक्षणपद्धतीवर पुन्हा एकदा विश्वासाची मोहोर उमटली आहे.
यंदाच्या बॅचने अनेक वैयक्तिक अडचणी, शैक्षणिक अंतर आणि भाषेच्या मर्यादा यांवर मात करत हे यश मिळविले. विद्यार्थ्यांच्या दैनंदिन जीवनात इंग्रजी भाषेचा कमी संपर्क असतानाही त्यांनी आत्मविश्वासाने शिक्षण स्वीकारून स्वतःची प्रगती साधली. विद्यार्थ्यांच्या या जिद्दीमुळे अभ्युदय ग्लोबल विलेज स्कूलने (एजीव्हीएस) ची वेगळी शैक्षणिक ओळख अधिक ठळक झाली आहे.
विद्यालयातील प्रथम क्रमांक विद्यार्थी वंश पांडुरंग चिमुरकर याने ९२.२० टक्के गुण मिळवत यश संपादन केले. द्वितीय क्रमांक आरोशी श्रावण पहाडे हिने ८७.६० टक्के गुण मिळविले, तर तृतीय क्रमांक सौरभ विजय बोंदरे याने ८५.२० टक्के गुण प्राप्त केले.
विशेष म्हणजे, प्रथम क्रमांक विद्यार्थी वंश चिमुरकर हा स्वयंअध्ययनावर भर देणारा विद्यार्थी असून शिक्षणासोबतच त्याने “Gronex” “ग्रोनेक्स” या मशरूम हार्वेस्टिंग स्टार्टअपवरही काम केले आहे. अभ्युदय ग्लोबल विलेज स्कूलने (एजीव्हीएस) साठी विविध शैक्षणिक उपक्रमांमध्ये त्याचे योगदान उल्लेखनीय राहिले आहे. विद्यार्थी जीवनातच उद्योजकतेची वाट निवडणारा वंश हा इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणास्थान ठरत आहे.
या यशासाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक लखन जांभूळकर, दर्शना पारडकर, कृणाल बागडे, प्रिया ठाकरे व यशोधरा सहारे यांनी विशेष परिश्रम घेतले. तसेच विद्यालयाच्या संस्थापिका माधुरी गांधी, संचालक सचिन देशपांडे व भाग्यश्री देशपांडे, तसेच मुख्याध्यापक मनोज वडस्कर यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
अभ्युदय ग्लोबल विलेज स्कूलने (एजीव्हीएस) विद्यालय केवळ गुणवंत विद्यार्थी घडवत नसून चारित्र्यसंपन्न, सक्षम आणि सामाजिक जाणीव असलेले विद्यार्थी तयार करण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असल्याचे यावेळी विद्यालय प्रशासनाने सांगितले.