spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

सकारात्मक दृष्टीकोनातून टीकेचा स्वीकार करावा ‘यशदा’तील प्रशिक्षक रविबाला काकतकर यांचे मार्गदर्शन

मुंबई :- एखाद्याने केलेली टीका आपण स्वीकारलीच नाही, तर तिचा आपल्या मनावर कोणताही परिणाम होत नाही, असा सकारात्मक दृष्टिकोन गौतम बुद्धांच्या बोधकथेतून समोर येतो. टीकेकडे नकारात्मकतेने न पाहता शांतपणे, संयमाने आणि आत्मविश्वासाने सामोरे जाणे हीच प्रभावी व्यक्तिमत्त्वाची ओळख असल्याचे प्रतिपादन ‘यशदा’तील प्रशिक्षक रविबाला काकतकर यांनी केले. सामान्य प्रशासन विभागामार्फत आयोजित “TECHवारी 2.0” अंतर्गत मंत्रालयात आयोजित विशेष तांत्रिक सत्रात त्या बोलत होत्या.

सामान्य प्रशासन विभागामार्फत आयोजित “TECHवारी 2.0” अंतर्गत मंत्रालय, येथील परिषद सभागृहात “The Art of Handling Criticism” या विषयावर विशेष तांत्रिक सत्राचे आयोजन करण्यात आले. यावेळी प्रसिद्ध कॉर्पोरेट ट्रेनर तसेच ‘यशदा’तील प्रशिक्षक वक्त्या रविबाला काकतकर यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांना संवाद कौशल्य, भावनिक संतुलन आणि टीकेकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहण्याबाबत मार्गदर्शन केले.

रविबाला काकतकर म्हणाल्या की, टीका हा जीवनाचा अविभाज्य भाग असून तिला नकारात्मक दृष्टीने पाहण्याऐवजी “फीडबॅक” म्हणून स्वीकारणे आवश्यक आहे. व्यक्त होणे आणि प्रतिक्रिया देणे यांतील फरक स्पष्ट करताना त्या म्हणाल्या की, भावनिक प्रतिक्रिया अनेकदा परिस्थिती अधिक गुंतागुंतीची बनवते, तर संयमाने आणि विचारपूर्वक दिलेले उत्तर व्यक्तीची परिपक्वता आणि नेतृत्वगुण दर्शवते.

न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रामिंग (NLP) तत्त्वांच्या माध्यमातून त्यांनी शब्दांची निवड, आवाजाचा स्वर आणि देहबोली यांचा व्यक्तिमत्व व संवादशैलीवर होणारा परिणाम स्पष्ट केला. टीका वैयक्तिक पातळीवर न घेण्याचा सल्ला त्यांनी दिला. मजबूत आत्मविश्वास आणि शांत मानसिकता व्यक्तीला प्रत्येक परिस्थितीत संतुलित ठेवतात असे सांगितले.

या संवादात्मक सत्रात योग्य प्रश्न विचारणे, समोरच्याचे म्हणणे संयमाने ऐकून घेणे आणि सकारात्मक दृष्टिकोन कायम ठेवणे ही प्रभावी नेतृत्वाची महत्त्वाची वैशिष्ट्ये असल्याचे त्यांनी उदाहरणांसह स्पष्ट केले. गौतम बुद्धांच्या जीवनातील एका प्रसंगाचा उल्लेख करत त्यांनी सांगितले की, एखादी व्यक्ती टीका स्वीकारत नसेल, तर ती टीका ज्या व्यक्तीने केली आहे त्याच्याकडे परत जाते.

उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी हे सत्र अत्यंत उपयुक्त, प्रेरणादायी आणि व्यवहार्य असल्याची भावना व्यक्त केली. संवाद कौशल्य, मानसिक संतुलन आणि सकारात्मक विचारसरणी यांवर आधारित हे सत्र TECHवारी 2.0 मधील प्रमुख आकर्षण ठरले.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.