spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

इंडियन ऑइलच्या सीएसआर उपक्रमातून सर जे. जे. रुग्णालयाला मिळणार अत्याधुनिक ब्रॉन्कोस्कोप प्रणाली – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

– मुख्यमंत्री यांच्या पुढाकारातून श्वसनविकारांच्या निदानाला मिळणार गती

मुंबई :- राज्यातील सार्वजनिक आरोग्य सेवांना अधिक सक्षम आणि आधुनिक करण्याच्या दिशेने आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे.इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड च्या सीएसआर उपक्रमांतर्गत मुंबईतील सर जे.जे.हॉस्पीटी येथे अत्याधुनिक हाय-डेफिनिशन व्हिडिओ ब्रॉन्कोस्कोप प्रणाली उपलब्ध करून देण्यात आली आहे.

सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढवून सर्वसामान्य नागरिकांना दर्जेदार उपचार उपलब्ध करून देण्यासाठी शासन सातत्याने प्रयत्नशील असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

सर जे. जे. रुग्णालयातील फुफ्फुसविकार विभागामध्ये दरमहा सुमारे ७० ते ८० ब्रॉन्कोस्कोपी प्रक्रिया केल्या जातात. क्षयरोग, विशेषतः औषध-प्रतिरोधक क्षयरोग, फुफ्फुसाचा कर्करोग, इंटरस्टिशियल लंग डिसीज आणि श्वसनमार्गातील अडथळे यांसारख्या गंभीर आजारांचे लवकर निदान करण्यासाठी ब्रॉन्कोस्कोपी अत्यंत महत्त्वाची मानली जाते. मात्र, जुन्या आणि कालबाह्य उपकरणांमुळे वेळेवर आणि अचूक निदान करण्यात अडचणी येत होत्या. याच पार्श्वभूमीवर इंडियन ऑइलने सीएसआरच्या माध्यमातून हाय-डेफिनिशन व्हिडिओ ब्रॉन्कोस्कोप प्रणाली उपलब्ध करून दिली असून त्यामुळे रुग्णालयाच्या निदान क्षमतेत मोठी वाढ होणार आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे श्वसनविकारांचे अचूक आणि जलद निदान शक्य होईल, तसेच गंभीर रुग्णांवर वेळेत उपचार सुरू करण्यास मदत मिळणार आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या उपक्रमाचे स्वागत करताना सांगितले की, राज्य शासनाच्या आरोग्य क्षेत्रातील सुधारणांना विविध उद्योगसमूह आणि सार्वजनिक उपक्रमांचे सहकार्य लाभत आहे. इंडियन ऑइलच्या या उपक्रमामुळे गरीब आणि गरजू रुग्णांना अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा सरकारी रुग्णालयातच उपलब्ध होतील. लवकर निदान आणि वेळेत उपचार यामुळे अनेकांचे प्राण वाचविण्यास मदत होईल.

या नव्या प्रणालीमुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील रुग्णांना खासगी रुग्णालयांमध्ये महागड्या तपासण्यांसाठी जाण्याची गरज कमी होणार असून सरकारी आरोग्य व्यवस्थेवरील नागरिकांचा विश्वास अधिक दृढ होणार आहे. श्वसनविकारांच्या उपचारामध्ये ही सुविधा महत्त्वाची ठरणार असून सार्वजनिक आरोग्य क्षेत्रात आधुनिक वैद्यकीय उपकरणांच्या उपलब्धतेसाठी सीएसआर भागीदारीचे हे एक प्रभावी उदाहरण मानले जात आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.