– अखेर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आक्रमक भूमिकेमुळे जीवघेणा खड्डा बुजला!
मोर्शी तालुका प्रतिनिधी :- मोर्शी विधानसभा मतदारसंघातील मोर्शी वरूड राष्ट्रीय महामार्गावरील हजारो नागरिकांना जखमी करून अनेकांचे बळी घेणारा मायवाडी येथील पुलाजवळ रस्ता दबल्यामुळे निर्माण झालेला जीवघेणा खड्डा अखेर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष रुपेश वाळके यांच्या आक्रमक भूमिकेमुळे अवघ्या 2 तासांच्या आत दुरुस्त करण्यात आला. या ठिकाणी रस्त्याची अवस्था अत्यंत धोकादायक बनली होती. दररोज शेकडो दुचाकी, चारचाकी तसेच मालवाहू वाहनांची या मार्गावरून मोठ्या प्रमाणावर वाहतूक होत असताना रस्ता दबून मोठे खड्डे निर्माण झाल्याने अपघातांची मालिका सुरू होती.
विशेष म्हणजे, या ठिकाणी अनेक वाहनचालकांना अपघाताचा सामना करावा लागला असून अनेक नागरिक मृत्यूमुखी पडून काही किरकोळ व गंभीर जखमी झाले होते. रात्रीच्या वेळेस या ठिकाणी अधिक धोका निर्माण होत होता. राष्ट्रीय महामार्गासारख्या महत्त्वाच्या मार्गावर अशी धोकादायक परिस्थिती निर्माण होऊनही संबंधित विभागाकडून तात्काळ दखल घेतली जात नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी होती.![]()
दरम्यान, या गंभीर समस्येकडे राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षाचे मोर्शी तालुका अध्यक्ष रुपेश प्रकाशराव वाळके यांनी लक्ष वेधले. त्यांनी घटनास्थळी भेट देत रस्त्याची पाहणी केली व नागरिकांच्या तक्रारी जाणून घेतल्या. त्यानंतर राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांशी संपर्क साधून तातडीने दुरुस्ती न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आक्रमक पवित्र्यानंतर प्रशासन तात्काळ खडबडून जागे झाले. संबंधित यंत्रणेने त्वरित कर्मचारी व यंत्रसामग्री घटनास्थळी पाठवून अवघ्या 2 तासांच्या आत रस्त्याची दुरुस्ती पूर्ण केली. खड्डा बुजवून डांबरीकरण करण्यात आल्याने वाहतूक सुरळीत झाली असून वाहनचालकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
याबाबत बोलताना रुपेश वाळके म्हणाले की, “जनतेच्या जीवाशी खेळ करणारा कोणताही निष्काळजीपणा सहन केला जाणार नाही. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नेहमीच रस्त्यावर उतरून संघर्ष करेल. प्रशासनाने वेळेत काम केले नाही तर भविष्यात अधिक तीव्र आंदोलन करण्यात येईल.”
या तात्काळ कारवाईमुळे स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व रुपेश वाळके यांच्या पाठपुराव्याचे कौतुक केले आहे. प्रशासनाने अशाच प्रकारे जनतेच्या प्रश्नांकडे तत्परतेने लक्ष दिले पाहिजे, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली.