वाशिम ०४ – समृद्धी महामार्गावर पुन्हा एकदा भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. वाशिम जिल्ह्यातील वनोजा ते कारंजा दरम्यान चॅनल क्रमांक २१५ नागपूर कॉरिडॉरवर कारचा अपघात झाला. या अपघातात वैदीही जयस्वाल आणि माधुरी जयस्वाल या दोघांचा जागीच मृत्यू झाला असून चेतन जयस्वाल, राधेश्याम जयस्वाल आणि संगीता जयस्वाल हे गंभीर जखमी झाले आहेत.
अपघातग्रस्त कुटुंब पुण्याहून उमरेड (नागपूर) येथे जात होते. कारचे नियंत्रण सुटल्याने वाहन थेट डिव्हायडरवर आदळले आणि मोठा अपघात घडला. जखमींना वाशिम येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
या घटनेनं पुन्हा एकदा समृद्धी महामार्गावरील सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. याआधीदेखील अशाच प्रकारच्या अपघातांत अनेकांनी आपले प्राण गमावले आहेत. गेल्या आठवड्यात नाशिकचे प्रसिद्ध उद्योजक सुनील हेकरे यांचा मर्सिडीज कार अपघातात मृत्यू झाला होता. त्यांच्या पत्नीसह दोन मुले गंभीर जखमी झाली होती. तातडीची वैद्यकीय मदत वेळेत न मिळाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला होता.
तसेच, काही दिवसांपूर्वी कसारा-शहापूर तालुक्यातील वाशिंद परिसरात क्रुझर जीप आणि ट्रकच्या अपघातात अब्दुल पाशा शेख (६५) आणि जाहीद सिद्दिकी (४०) यांचा मृत्यू झाला होता. यात दोन लहान मुले, तीन महिला आणि दोन पुरुषही जखमी झाले होते.
या सगळ्या घटनांमुळे समृद्धी महामार्ग आता ‘अपघाती महामार्ग’ बनत चालला आहे का, असा गंभीर सवाल उपस्थित होत आहे. प्रशासन आणि रस्ते विकास प्राधिकरणाने याची तातडीने दखल घ्यावी, अशी मागणी स्थानिकांकडून जोर धरू लागली आहे.




