– ४ हजारांची पावती नाही; जाब विचारताच गंभीर रुग्णास रुग्णालयातुन परत पाठविल्याचा कुटुंबीयांचा दावा
कन्हान :- जबलपुर नागपुर मार्गावरील अरुणा हॉस्पिटलमध्ये आयुष्मान भारत योजने अंतर्गत मोफत उपचाराचे आश्वासन देऊन रुग्णाच्या नातेवाइकांकडुन पैसे घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे. ४ हजार रुपये घेतल्यानंतर त्याची पावती देण्यात आली नसल्याचे तसेच याबाबत जाब विचारल्यानंतर गंभीर प्रकृतीच्या रुग्णाला रुग्णालयातुन परत पाठविण्यात आल्याचा दावा कुटुंबीयांनी केला आहे.
कन्हान येथील भीमराव रामटेके (५१) यांची १३ सप्टेंबरला सायंकाळी प्रकृती अचानक बिघडली. त्यांच्या मुलाच्या म्हणण्यानुसार अरुणा हॉस्पिटलशी संपर्क साधला असता आयुष्मान योजनेअंतर्गत उपचार करण्यात येतील आणि कोणतेही पैसे द्यावे लागणार नाहीत असे सांगण्यात आले. त्यानंतर रात्री रुग्णाला रुग्णवाहिकेतुन रुग्णालयात दाखल करण्यात आले.
मात्र रुग्णाला रुग्णवाहिकेतुन खाली उतरण्यापूर्वी १० हजार रुपये जमा करण्यास सांगण्यात आल्याचा आरोप आहे. एवढी रक्कम उपलब्ध नसल्याने कुटुंबीयांनी ४ हजार जमा केले. त्यानंतर रुग्णाला दाखल करण्यात आले. या रकमेची पावती देण्यात आली नसल्याचे कुटुंबीयांचे म्हणणे आहे. १३ ते १७ सप्टेंबर दरम्यान उपचार सुरू होते. १७ सप्टेंबरला नागपुर येथे तपासणीसाठी प्रथम १३ हजार आणि त्यानंतर आणखी ७ हजार खर्च येणार असल्याचे सांगण्यात आल्याचा दावा कुटुंबीयांनी केला. आयुष्मान योजनेअंतर्गत उपचार असताना अतिरिक्त पैसे कशासाठी मागितले जात आहेत, असा प्रश्न उपस्थित केल्यानंतर परिस्थिती तणावपूर्ण झाल्याचे त्यांनी सांगितले. यानंतर गंभीर प्रकृतीच्या रुग्णाला रुग्णालयातुन पाठविण्यात आल्याचा आरोप आहे. डिस्चार्ज कार्ड, उपचाराची समरी, तपासणी अहवाल व इतर वैद्यकीय कागदपत्रे तत्काळ देण्यात आली नसल्याचेही कुटुंबीयांनी सांगितले.रुग्णाची प्रकृती गंभीर असताना योग्य रेफर व रुग्णवाहिकेची व्यवस्था करण्यात आली नसल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
स्थानिक समाजसेवक आणि पोलिसांच्या मदतीनंतर रुग्णाची फाइल मिळाल्याचे कुटुंबीयांनी सांगितले. या प्रकरणाची आरोग्य विभागाने निष्पक्ष चौकशी करून ४ हजारांची रक्कम, आयुष्मान योजने तील उपचार व संभाव्य क्लेमची नोंद तपासावी. दोष आढळल्यास संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी कुटुंबीयांनी केली आहे.





