spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

खेड ग्रामपंचायतीतील गैरव्यवहार प्रकरणी सरपंचांविरोधात कारवाई सुरू – मंत्री जयकुमार गोरे

मुंबई :- सातारा जिल्ह्यातील खेड ग्रामपंचायतीतील विकासकामांमध्ये झालेल्या अनियमिततेप्रकरणी सरपंचांविरोधात कारवाई सुरू करण्यात आल्याची माहिती मंत्री जयकुमार गोरे यांनी विधान परिषदेत दिली.

नियम ९२ अन्वये अर्धा तास चर्चेत सदस्य शशिकांत शिंदे यांनी याबाबत सूचना उपस्थित केली होती.

मंत्री जयकुमार गोरे म्हणाले, २८ जानेवारी २०२३ रोजी करण्यात आलेल्या तपासणीत ग्रामपंचायतीतील काही विकासकामांमध्ये अनियमितता आढळून आली. त्यानंतर गट विकास अधिकाऱ्यांनी २ मार्च २०२३ रोजी विस्तार अधिकाऱ्यांना चौकशीचे आदेश दिले. चौकशीदरम्यान ग्रामविकास अधिकारी यांच्याकडून खुलासा मागविण्यात आला होता. यानंतर विकासकामांची तांत्रिक तपासणी करण्यासाठी उपअभियंत्यांच्या समितीची नियुक्ती करण्यात आली. या समितीने ५ मे २०२३ रोजी सादर केलेल्या अहवालात खेड ग्रामपंचायतीत १२ कामे अंदाजपत्रक, तांत्रिक मान्यता आणि निविदा प्रक्रिया न करता करण्यात आल्याचे निष्पन्न झाले.

जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर या प्रकरणाची फेरचौकशी करण्यात आली.

या पार्श्वभूमीवर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी ग्रामविकास अधिकाऱ्यांना निलंबित केले आहे. तसेच सरपंचांविरोधात ग्रामपंचायत कायद्यानुसार कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. यासंदर्भातील प्रस्ताव विभागीय आयुक्तांकडे पाठविण्यात आला असून याची पहिली सुनावणी झाली आहे. या प्रकरणाचा निर्णय नियोजित मुदतीत घेण्यासाठी विभागीय आयुक्तांना आवश्यक सूचना देण्यात येणार असून संबंधितांवर पुढील कारवाई केली जाईल असे मंत्री जयकुमार गोरे यांनी यावेळी सांगितले.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.