– विनाहेल्मेट वाहन चालवणारे ९२४ चालक पोलिसांच्या कारवाईच्या कक्षेत
नागपूर :- शहरात वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात वाहतूक पोलिसांनी विशेष मोहीम राबवून एकाच दिवसात १,७६२ वाहनचालकांवर कारवाई केली. या कारवाईत एकूण ३ लाख ३७ हजार ७०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
कारवाईदरम्यान विनाहेल्मेट वाहन चालवणाऱ्या सर्वाधिक ९२४ चालकांवर कारवाई करण्यात आली. तिहेरी सीटने प्रवास करणाऱ्या १४५, विरुद्ध दिशेने वाहन चालवणाऱ्या १०२, विनापरवाना वाहन चालवणाऱ्या ६३ आणि सिग्नल तोडणाऱ्या ५७ चालकांवरही कारवाई झाली.याशिवाय रस्त्यावर वाहनांचे पार्किंग करणाऱ्या २११, अतिवेगाने वाहन चालवणाऱ्या २७ आणि बेदरकारपणे वाहन चालवणाऱ्या एका चालकावर कारवाई करण्यात आली. फॅन्सी नंबरप्लेट असलेल्या १३, सीट बेल्ट न लावणाऱ्या ५ आणि वाहन चालवताना मोबाईलचा वापर करणाऱ्या १० चालकांवरही दंडात्मक कारवाई झाली. मद्यप्राशन करून वाहन चालवण्याच्या १० प्रकरणांची नोंद करण्यात आली.दरम्यान, अंमली पदार्थ आणि जुगारविरोधी कायद्यांतर्गतही पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत अनुक्रमे ४ हजार २६० आणि १२ हजार १८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.





