भंडारा, १८ : मौजे मांढळ (ता. तुमसर) येथे गोदावरी फर्टिलायझर कंपनीकडून विनापरवाना सेंद्रिय खत विक्री होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर कृषी विभागाने संयुक्त कारवाई करत संबंधितांवर गुन्हा दाखल केला आहे.
16 जुलै,2025 रोजी कृषी अधिकारी (गुण नियंत्रण) हेमराज धांडे यांना माहिती मिळाली की, गोदावरी फर्टिलायझर कंपनीचे प्रतिनिधी “गोदावरी गोल्ड” हे खत शेतकऱ्यांना थेट घरोघरी जाऊन विकत आहेत. यावर त्वरित कारवाई करत त्यांनी जिल्हा भरारी पथकातील अभिजीत पटवारी यांच्याशी संपर्क साधला.
त्यानंतर भरारी पथक प्रमुख विकास सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली तपासणी केली असता, MH28BA2299 क्रमांकाच्या ट्रकमधून संबंधित खतांची विक्री होत असल्याचे आढळले. गावातील शेतकऱ्यांनी खताच्या एका बॅगसाठी 900 रुपये मोजल्याची माहिती दिली. मात्र विक्री दरम्यान कोणताही वैध परवाना नसल्याचे व खोटी बिले देण्यात आल्याचे उघड झाले.
या प्रकारामुळे खत नियंत्रण आदेश 1985 अंतर्गत मोहाडी पोलीस स्टेशनमध्ये गोदावरी फर्टिलायझर कंपनी, त्याचे प्रतिनिधी आणि उमंग कृषी सेवा केंद्र, तिरोडा यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कारवाईदरम्यान एकूण 47 बॅग्स खत जप्त करण्यात आले असून, त्याची अंदाजे किंमत ₹68,150 इतकी आहे. पुढील तपास पोलीस प्रशासनाकडून सुरू आहे.




