पांढरकवडा :- शहरातील आठवडी बजार परिसरात सुरू असलेल्या जुगार अड्यावर पोलिसांनी सोमवारी दुपारी धाड टाकून तिघांना ताब्यात घेतले. या कारवाईत ३९ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून संबंधितांविरुद्ध कलम १२ (अ) महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा तसेच कलम ४९ बीएनएस अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय पांढरकवडा येथील पथकाला आठवड़ी बाजार परिसरात जुगार सुरू असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी रॉबिन बंसल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी सोमवारी दुपारी सुमारे २ वाजताच्या सुमारास कारवाई केली. पोलिसांनी आठवडी बाजार परिसरातील एका टिनशेडमध्ये छापा टाकला असता काही इसम ‘चेंगड’ नावाचा जुगार खेळतांना आढळून आले. पोलिसांनी पंचांसमक्ष झडती घेतली असता आरोपींकडून मोठी रोकड, मोबाईल आणि गंजीपत्ते जप्त करण्यात आले. कारवाई दरम्यान मनोज मिठाईलाल गुप्ता (वय ३१), राजेश प्रल्हाद सिडाम (वय५९) व मंगेश प्रल्हाद सिडाम (वय ६७, सर्व रा. आठवड़ी बाजार, पांढरकवडा) यांच्याकडून एकूण ३६ हजार ६०० रुपये रोख , १०४ गंजीपत्ते तसेच ३ हजार रुपये किमतीचा विवो कंपनीचा मोबाईल असा एकूण ३९ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदरची कारवाई पोलीस उपनिरीक्षक प्रमोद घोटेकर, पोलीस जमादार प्रशांत चौकाडे, महेश नाईक, शरद शिवणकर यांनी पार पाडली.








