spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

नायलॉन मांजा वापरल्यास पर्यावरण कायद्यांतर्गत होणार कारवाई !

– भंडारा नगरपरिषदेचा कडक इशारा; मुख्याधिकारी जुम्मा प्यारेवाले यांचे आवाहन

हंसराज प्रतिनिधी,भंडारा :- मकरसंक्रांतीच्या सणानिमित्त पतंग उडवण्यासाठी वापरण्यात येणारा प्लास्टिकयुक्त ‘नायलॉन मांजा’ मानवी जीवन, प्राणी आणि पक्ष्यांसाठी जीवघेणा ठरत आहे. या पार्श्वभूमीवर, भंडारा नगरपरिषदेने नायलॉन मांजाच्या विक्रीवर आणि वापरावर कडक निर्बंध लादले आहेत. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर ‘पर्यावरण (संरक्षण) कायदा, १९८६’ च्या कलम ५ अन्वये फौजदारी कारवाई करण्यात येईल, असा इशारा मुख्याधिकारी जुम्मा प्यारेवाले यांनी दिला आहे.

मुख्याधिकाऱ्यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार, प्लास्टिक किंवा कृत्रिम वस्तूंपासून बनवलेला नायलॉन मांजा अत्यंत पक्का आणि अविघटनशील असतो. यामुळे आकाशात उडणारे पक्षी, रस्त्यावरून जाणारे नागरिक आणि प्राण्यांना गंभीर दुखापत होऊन अनेकदा प्राण गमवावे लागतात. या घटनांची गांभीर्याने दखल घेत, शासनाने अशा मांजाच्या वापरावर पूर्णपणे बंदी घातली आहे.

विक्रेत्यांना कडक निर्देश

शहरातील नायलॉन मांजाचे घाऊक (Wholesaler) व्यापारी, किरकोळ विक्रेते आणि साठवणूकदार यांनी नायलॉन मांजाची विक्री, साठवणूक व हाताळणी त्वरित थांबवावी. केवळ संक्रांतीच्या काळातच नव्हे, तर वर्षभर कोणत्याही स्वरूपात नायलॉन मांजाचा साठा आढळल्यास प्रशासनाकडून कठोर कारवाई केली जाईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

विद्युत यंत्रणेला धोका

पतंग उडवताना नायलॉन मांजा विजेच्या तारांमध्ये अडकल्यास घर्षण होऊन आग लागण्याचे प्रकार घडतात. यामुळे वीज उपकेंद्रे बंद पडणे, ट्रान्सफॉर्मरमध्ये बिघाड होणे किंवा विजेची उपकरणे जळून मोठे अपघात होण्याची शक्यता असते. सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान आणि नागरिकांची सुरक्षा लक्षात घेता नायलॉन मांजा टाळणे आवश्यक आहे.

पारंपारिक संक्रांत साजरी करा

नायलॉन मांजा हा निसर्गासाठी घातक असून त्यामुळे माती आणि पाण्याच्या गुणवत्तेची पातळी खालावते. त्यामुळे पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी नागरिकांनी नायलॉन मांजाचा मोह सोडून पारंपारिक सुती धाग्याचा (मांजाचा) वापर करावा आणि संक्रांतीचा उत्सव सुरक्षितपणे साजरा करावा, असे आवाहन मुख्याधिकारी जुम्मा प्यारेवाले यांनी भंडारा शहरातील जनतेला केले आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.